पुणे – शहरात आज नव्याने 1,192 बाधितांची भर पडली आहे. तर, 1,312 जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, दिवसभरात करोनामुळे 28 जणांचा मृत्यूची नोंद झाली असून, मृतांची एकूण संख्या 1 हजार 412 वर पोहचली आहे.
करोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रशासनाने गंभीर रुग्णांवरील उपचारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. रुग्णांची आतापर्यंतची संख्या 59 हजार 496 वर पोहोचली असताना, आतापर्यंत 41 हजार 251 जण बरेही झाले आहेत. सद्यस्थितीत शहरातील विविध रुग्णालयांत 16 हजार 833 बाधितांवर उपचार सुरू आहे.
त्यातील 656 बाधितांची प्रकृती चिंताजनक असून, 404 बाधित व्हेंटिलेटरवर आहेत. तर 252 जणांवार आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. दरम्यान, आज 5 हजार 595 संशयितांचे स्वॅब आणि रॅपिड ऍन्टिजेन तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शहरात 15 ऑगस्टपर्यंत करोना बाधितांची संख्या लाखापर्यंत जाण्याचा अंदाज महापालिकेकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ऍक्टिव्ह रुग्णांवरील उपचार आणि विलगीकरणासाठी ऑक्सिजन व व्हेंटिलेटरची सुविधा असलेली तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्यास प्रशासनाने सुरूवात केली आहे. यासोबत सार्वजनिक गणेश मंडळे आणि संस्थांही विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ही सकारात्मक बाब आहे.