लखनौ/ आझमगढ – उत्तर प्रदेशच्या आझमगढ मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने विद्यमान खासदार दिनेश लाल यादव निरहुआ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.२०२२ च्या पोटनिवडणुकीत त्यांचा विजय झाल्यानंतर भोजपुरी चित्रपटसृष्टीचे सुपरस्टार असलेल्या निरहुआ यांनी आपल्या मतदारसंघात अनेक चित्रपटांचे शूटींग केले.
चित्रपट आणि पर्यटन उद्योगाला त्यांनी या भागात खूप प्रोत्साहन दिले. एवढेच नाही तर उत्तर प्रदेशच्या पूर्व भागात असलेल्या त्यांच्या या मतदार संघांत किमान दोन डझन चित्रपटांचे शूटींग झाले आहे व त्या बहुतांश चित्रपटांत त्यांनी स्थानिकांनाच काम दिले आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अलिकडेच आझमगढचा दौरा केला होता. त्यावेळी केलेल्या भाषणात योगींनी निरहुआची फिरकी घेतली होती. जर सगळेच कार्यकर्ते चित्रपटात काम करायला लागले तर पक्षाचे काम कोण करणार असे योगी तेंव्हा म्हणाले.
यावरून निरहुआ यांच्या कामाला त्यांनी पावतीच दिल्याचे मानले जाते. केवळ चित्रपटांतच नाही तर संसदेतही निरहुआ ॲक्टीव्ह आहेत. संसदेत खासदारांच्या उपस्थितीची टक्केवारी सरासरी ८० असते. तसेच जे खासदार सेलिब्रिटी असतात त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ५६ टक्क्यांच्या आसपास आहे. सध्या संसदेत १९ सेलिब्रिटी खासदार आहेत.
यातील केवळ चार जणांची संसदेतील उपस्थिती राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. त्यातही या चार जणांमध्ये निरहुआ पहिल्या क्रमांकावर असून त्यांच्या उपस्थितीचे प्रमाण ९० टक्के आहे. आपल्या उमेदवारीबाबत निरहुआ सांगतात की वर्षानुवर्षे आझमगढमधून समाजवादी पक्षाचा विजय होत आला आहे.
मात्र हे लोक निवडून आल्यावर निघून जातात. त्यांनी आझमगढसाठी काहीच केले नाही. आपण पोटनिवडणुकीतील विजयानंतर जी दीड वर्षांची संधी मिळाली त्यात पन्नास वर्षांत झाले नाही एवढे काम केले आहे. येथे विद्यापीठाची स्थापना केली, अटलजींच्या नावाने निवासी विद्यालय स्थापन केले, रिंग रोड केला, विमाने उतरू शकतील अशी व्यवस्था केली.
गेली ४०-५० वर्षे येथे रस्त्यांचे काम झाले नव्हते आणि आम्ही चांगले रस्ते केले. समाजवादी पक्षाचे येथे १० आमदार आहेत. त्यांच्या गावांतही मी रस्ते तयार केले.