Team India Head Coach : ‘बीसीसीआय’ची पहिली पसंती गौतम गंभीरला? कोहलीसह ‘या’ वरिष्ठ खेळाडूच्या आहे संपर्कात….

Team India Head Coach & BCCI : भारतीय पुरुष वरिष्ठ क्रिकेट संघाच्या नवीन प्रशिक्षकाचा शोध जोरात सुरू असून अर्ज करण्याची शेवटची तारीख आता फक्त एक आठवडा उरली आहे. विश्वचषकानंतर राहुल द्रविड प्रशिक्षकपद सोडणार आहे. याआधी बीसीसीईने संघासाठी नवीन प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे. अनेक मिडिया रिपोर्टनुसार, माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर हा राहुल द्रविडची जागा घेणाऱ्या प्रमुख उमेदवारांपैकी एक असून त्याचे नाव आघाडीवर आहे.
या शर्यतीत गंभीरशिवाय इतरही अनेक दिग्गज खेळाडूंची नावे पुढे येत आहेत. ज्यामध्ये स्टीफन फ्लेमिंग, जस्टिन लँगर आणि महेला जयवर्धने यांचा समावेश आहे. बीसीआयने मुख्य प्रशिक्षकपदासाठी आशिष नेहराशीही संपर्क साधल्याचे एका अहवालात म्हटले आहे. या सगळ्या दरम्यान गौतम गंभीर भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडूंच्या संपर्कात असल्याच्या बातम्या येत आहेत.
गंभीरशी बोलू शकते बीसीसीआय…
अलीकडच्या काळात पाहिल्यास गंभीर हा बीसीसीआयची पहिली पसंती राहिला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआय येत्या काही दिवसांत गंभीरशी बोलण्याची शक्यता आहे.
IPL 2024 (RCB vs RR Eliminator) : ..तर सामना ‘न’ खेळताच RCB चे आयपीएलमधील आव्हान येणार संपुष्टात….
त्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, “संभाव्य उमेदवारांशी कोणताही औपचारिक संवाद झालेला नाही. सर्व प्रशिक्षक आपला वेळ घेत आहेत आणि पर्यायांचा विचार करत आहेत. पण गौतम गंभीरची स्थिती मजबूत झाल्याचे दिसते. बोर्डाचे अधिकारी गंभीरशी अहमदाबादमध्ये बोलू शकतात.”
गंभीर संघातील वरिष्ठ सदस्यांच्या संपर्कात असल्याचा दावाही रिपोर्टमध्ये (अहवाल) करण्यात आला आहे. ज्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीचाही समावेश आहे. गंभीर आणि कोहली यांच्यात मैदानावर बरेच मतभेद झाले आहेत, पण दोघांनीही आपले जुने मतभेद मिटवले आहेत.
दरम्यान, सध्या गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सशी मेंटॉर म्हणून संबंधित आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली कोलकाताने या मोसमात अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी त्याच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने दोन आयपीएल ट्रॉफीही जिंकल्या आहेत.





