चिथावणीखोर भाषणबाजी मगंल प्रभात लोढांच्या अंगलट

निवडणूक आयोगाने पाठवली नोटीस

मुंबई : राज्यात सध्या विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराने चांगलाच जोर धरला आहे. त्यामुळे विविध पक्ष नेत्यांकडून काही प्रमाणात आक्रमक आणि बेताल भाषणाबाजीही केली जात आहे. अशीच बेताल भाषणबाजी भाजपाचे मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांच्या अंगलट आली आहे. कारण प्रचारादरम्यान, लोढा यांनी चिथावणीखोर भाषणबाजी प्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस पाठवली असून यावर स्पष्टीकरणही मागितले आहे.


मुंबईत 16 ऑक्‍टोबर रोजी मुंबादेवी मतदारसंघात महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार पांडुरंग सकपाळ यांच्या प्रचार सभेत मंगल प्रभात लोढा यांनी चिथावणीखोर भाषण केले होते. या भाषणात त्यांनी 1992 मधील मुंबईतील दंगलींचा उल्लेख केला. या दंगलींवेळी स्फोट झाले आणि गोळ्या झाडल्या गेल्या त्या इथून केवळ पाच किमी अंतरावरील गल्ल्यांमधून झाडण्यात आल्या होत्या. यामध्ये 250 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या लोकांच्या मतांवर जिंकलेली व्यक्ती आपल्या मदतीसाठी कशी येईल, अशा शब्दांत लोढा यांनी कॉंग्रेसचे उमेदवार अमीन पटेल यांचे नाव न घेता टीका केली होती. लोढा यांच्या या भाषणाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता. मुंबादेवी मतदारसंघात डोंगरी आणि नागपाडा हे भाग येतात या ठिकाणी अल्पसंख्यांकांची संख्या जास्त आहे.

जुन्या इमारती पडल्यानंतर इथल्या रहिवाशांना मानखुर्द आणि धारावीत स्थलांतरीत केले जाते. त्यामुळे असे वाटते की ही ठिकाणे फक्त काही विशेष समाजाच्या लोकांसाठीच राखीव ठेवण्यात आली असल्याचेही लोढा यांनी होते. मात्र, हिंदू-मराठी बांधवांना दूरच्या भागांमध्ये शिबिरांमध्ये जावे लागते. अशा प्रकारे केलेल्या चिथावणीखोर विधानांसाठी भाजपा मुंबई अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली आहे. आयोगाने लोढा यांना त्यांच्या वक्तव्यावर उत्तर देण्याबरोबरच त्याचे स्पष्टीकरणही मागवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.