निवडणुकीत साडेतीन हजार जणांवर कारवाई

पुणे – विधानसभा निवडणुकीत डोकेदुखी ठरू पाहणाऱ्या शहरातील 3 हजार 381 सराईतांची पोलिसांनी चौकशी केली असून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सराईतांना नोटीस बजावून त्यांना समज देण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुका शांततेत होण्यासाठी पोलिसांनी गेल्या महिन्याभरापासून तयारी सुरू केली आहे. शहरातील गुंड टोळ्या, त्यांचे म्होरके, साथीदार तसेच गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईतांची यादी पोलिसांनी तयार केली. शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या सराईतांच्या नाव-पत्यांची यादी स्थानिक पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेला उपलब्ध करून देण्यात आली. त्यानुसार दररोज 10 ते 20 सराईतांची चौकशी करण्यात येत आहे. गुंड टोळ्यांचे म्होरके, साथीदारांना पोलीस ठाणे तसेच गुन्हे शाखेत हजेरी लावण्याची सूचना देण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्‍त बच्चन सिंह यांनी दिली.

ते म्हणाले, शहरातील विविध गुन्हेगारी टोळ्यातील 354 सराईतांची चौकशी करण्यात आली. गेल्या 5 वर्षांत ज्यांना शहरातून तडीपार केले आहे, तसेच ज्यांच्यावर झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली. अशांच्या हालचालींवर पोलिसांची बारकाईने नजर ठेवली आहे.

197 जणांची चौकशी
निवडणुकांमध्ये 197 जणांवर गुन्हे दाखल झाले होते. निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. शहरात गेल्या काही वर्षांत किरकोळ वाद तसेच पूर्ववैमनस्यातून सामान्यांच्या वाहनांची तोडफोड करून दहशत निर्माण करण्याच्या घटना घडल्या आहेत. तोडफोडीच्या गुन्ह्यांमध्ये गेल्या 5 वर्षांत 402 जणांना अटक केली होती. त्यांच्यावर पोलिसांनी नजर ठेवली असून त्यांना प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजाविली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)