मुंबई : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर एका तरुणीने लैंगिक अत्याचाराचे आरोप केले होते. या प्रकरणावरून राज्यात मागील काही दिवसांपासून राजकीय नाट्य पाहायला मिळत आहे. दरम्यान,आता या प्रकरणी पीडित मुलीनेच भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर आरोप केले आहेत. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर आल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यन चित्रा वाघ यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सगळे आरोप धादांत खोटे असल्याचे सांगत याप्रकरणी स्पष्टीकरण दिलं आहे.
“मी पीडितेला सर्वतोपरी मदतचं केली. तरीही माझ्यावरच खोटे आरोप करण्यात आल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी पुणे पोलीस आयुक्तांना मेल/लेखी अर्जाद्वारे केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. तसेच, पोलीस सखोल चौकशी करतील ही अपेक्षा असल्याचेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी ट्वीट केले आहे.
पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडितेने काही दिवसांपूर्वी तिला भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी फुस लावल्याचे म्हटले होते. त्यामुळे या प्रकरणाला नाट्यमय वळण मिळाले. या प्रकरणात शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यासह आठ लोकांवरती गुन्हा दाखल झाला आहे.
पुण्यातील शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 19 फेब्रुवारी रोजी याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता या पीडितेने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या सांगण्यावरून आपण रघुनाथ कुचिक यांच्याविरोधात तक्रार दिल्याचे खळबळजनक दावा केला आहे.