नगर -पत्नीचा छळ केल्याप्रकरणी येथील आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेले पती सहा.पोलीस निरीक्षक अभिजीत जाधव यांच्यासह तिघांविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. 22) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नीने फिर्याद दिली आहे.
पती अभिजीत प्रभाकर जाधव, सासू सुलोचना प्रभाकर जाधव व जाव सुरेखा सचिन जाधव (सर्व मुळ रा. नाशिक, हल्ली रा. पाइपलाइन रस्ता, सावेडी, नगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी यांचा विवाह अभिजीत जाधव यांच्यासोबत डिसेंबर 2007 मध्ये झाला होता. लग्नानंतर फिर्यादी सासरी नांदत असताना सासरचे लोक त्यांच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद घालत होते. अभिजीत जाधव यांची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर ते पुणे येथे राहण्यासाठी गेले.
तेथे देखील अभिजीत यांनी फिर्यादीचा छळ सुरूच ठेवला. दरम्यान, अभिजीत यांची नाशिक येथे बदली करण्यासाठी फिर्यादीला माहेरून दोन लाख रूपये आणण्यास सांगितले. फिर्यादीने दोन लाख रूपये आणल्यानंतर अभिजीत यांची नाशिक येथे बदली झाली. तेथेही अभिजीत यांच्यासह सासू व जाव यांनी फिर्यादीचा छळ केला. अभिजीत यांची नगर येथे बदली झाल्यानंतर ते कुटुंबासह नगरमध्ये राहण्यास आले. अभिजीत यांच्या वागणूकीबाबत फिर्यादी यांनी त्यांना विचारणा केली असता त्यांनी मारहाण केली.