संस्थाचालकांकडून घेणार हमीपत्र : निवडणूक विभागाचे आदेश
पिंपरी – निवडणुकांमध्ये खाजगी संस्थाचालकाकडून आपल्या संस्थेतील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांचा निवडणुकीच्या प्रचारात वापर करुन घेत असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. विधानसभा निवडणुकीत शिक्षकांना प्रचाराच्या कामात जुंपल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेश निवडणूक विभागाने दिलने आहेत.
निवडणूक विभागाने आता खाजगी अनुदानित संस्था तसेच सहकारी शिक्षण संस्थेतील संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेतील मनुष्यबळाचा कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या प्रचारासाठी वापर करु नये, असे आदेश दिले आहेत. तसेच संस्थाचालकाकडून याबाबत लेखी हमीपत्र घेतले जाणार असून त्यानंतरही संस्थेतील कर्मचारी निवडणुकीच्या कामात दिसून आला तर अशा संस्थाचालकांविरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
पुढील महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही खासगी अनुदानित, खासगी शिक्षण संस्था व सहकारी संस्था चालकांनी त्यांच्या संस्थेतील मनुष्यबळाचा वापर केवळ नेमून दिलेल्या संस्था कामकाजासाठीच करावा, अशी ताकीद दिली आहे. संस्थाचालकांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये संस्थेतील शिक्षक व कर्मचारी राजकीय उमेदवाराच्या प्रचारासाठी वापरले जाणार नाहीत याचे लेखी हमीपत्र शिक्षण विभागाला द्यायचे आहे. या हमीपत्रामध्ये आचारसंहिता पालनाची लेखी ग्वाही घेण्यात येणार आहे. तसेच कर्मचाऱ्यांचा प्रचारासाठी गैरवापर केल्यास कारवाई करण्याचा स्पष्ट उल्लेख या हमीपत्रामध्ये असणार आहे. त्यानंतरही एखाद्या संस्थाचालकाने आपल्या शिक्षकांचा प्रचारासाठी वापर केल्यास त्यांच्याविरुध्द कडक कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला दिले आहेत.