पिंपरी -पिंपरी-चिंचवड शहरातील 31 हजार 387 मिळकत कर थकबाकी धारकांना महापालिकेच्या वतीने नोटीस देण्यात आल्या आहेत. या थकबाकीदारांसाठी आज (शनिवार) लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. या लोक अदालतमध्ये 70 टक्के दंड माफ करून कर भरण्याची सुविधा देण्यात येणार असल्याचे करसंकलन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
शहरातील महापालिकेच्या कर संकलन झोनमधील 16 कार्यालयात आणि आकुर्डी न्यायालयात आज (शनिवार) सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत लोक अदालत होणार आहे. शहरात सव्वा पाच लाख 68 हजार मिळकती आहेत. करसकंलन विभागाला 2021-22 या आर्थिक वर्षांत 900 कोटींचे उदिष्ट देण्यात आले आहे. शुक्रवारअखेर कर संकलन विभागाने 440 कोटींचा टप्पा पार केला आहे. कर संकलन विभाग अजूनही उदिष्टांपेक्षा 50 टक्के पिछाडीवर आहे. जास्तीत-जास्त मिळकत कर वसुलीसाठी कर संकलन विभागाच्या वतीने जोरदार मोहीम सुरू आहे. शहरात अद्यापही मोठ्या प्रमाणात मिळकत धारक थकबाकीदार आहेत. महापालिकेच्या वतीने शहरातील 31 हजार 387 थकबाकीदारांना नोटीस देण्यात आल्या आहेत. मिळकत कर न भरल्यास मिळकत धारकाला प्रतिमहा 2 टक्के विलंब दंड महापालिकेच्या वतीने आकारण्यात येतो. लोक अदालतीमध्ये या थकबाकीदारांना दंडाच्या रक्कमेत 70 टक्के सवलत देण्यात येणार असून 30 टक्के रक्कम भरायची आहे.
याबाबत कर संकलन विभागाचे सहायक आयुक्त नीलेश देशमुख म्हणाले, शहरात मिळकत थकबाकीदारांची मोठी संख्या आहे. अशा 31 हजार 387 थकबाकीदारांना महापालिकेच्या वतीने नोटीसा देण्यात आल्या आहेत. अशा थकबाकीदारांनी लोक अदालतचा फायदा घेऊन मिळकत कर भरावा, असे आवाहनही देशमुख यांनी केले.
====================