भर पावसात हजारोंच्या उपस्थितीमध्ये भाजपचे भव्य शक्‍तीप्रदर्शन

बाळा भेगडे यांच्या जयघोषाने तळेगाव दुमदुमले
तळेगाव दाभाडे – विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी भारतीय जनता पक्षाने तळेगाव दाभाडे येथे भव्य शक्‍तीप्रदर्शन करत रॅली काढली. भर पावसात हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये तळेगावात तरुण आणि महिलांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या जयघोषाने तळेगावनगरी दुमदुल्याचे चित्र पहावयास मिळाले. बाळा भेगडे तिसऱ्यांदा भरघोस मताने निवडून येणार, असा विश्‍वास कार्यकर्त्यांनी व्यक्‍त केला.

पावसाची संततधार सुरू असतानाही तळेगावमध्ये भाजपच्या प्रचार रॅलीत असंख्य तरुणांनी ढोल-ताशांच्या गजरात राज्यमंत्री बाळा भेगडे यांची प्रचार रॅली काढली. प्रचार रॅलीची सुरुवात मारुती मंदिर येथील भाजप कार्यालयापासून करण्यात आली. पुढे ही रॅली जिजामाता चौक, शाळा चौक, दाभाडे आळी, चावडी चौक, डोळसनाथ मंदिर, कुंभार वाडा, भेगडे आळी चौक, गणपती चौक, बाजार पेठ, राजेंद्र चौक, मारुती मंदिर, काळोखेवाडी, खांडगे पेट्रोल पंप, राव कॉलनी, कडोलकर कॉलनी असे मार्गाक्रमण करत प्रचाराची सांगता तळेगाव दाभाडे मारुती मंदिर चौक येथे करण्यात आली.

या वेळी तरुणांच्या प्रतिसादाने तळेगाव शहर गजबजलेले होते. तरुणांनी दिलेल्या जोरदार घोषणांचा आणि ढोल ताशांचा आवाज संपूर्ण तळेगावात घुमत होता. राज्यमंत्री बाळा भेगडे यांनीही भर पावसात उतरून तरुणांसोबत भिजत रॅलीचा आनंद घेतला. नंतर भेगडे यांना तरुणांनी खांद्यावर घेत रॅली काढली. यावेळी तरुणांचा उत्साह हा राज्यमंत्री बाळा भेगडे यांना मिळणाऱ्या यशाची जणू काही चाहूल देणाराच होता. संपूर्ण शहरच भाजपमय झाल्याचे यावेळी दिसून आले.

देहूतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपात
निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यावर आला असतानाच देहू येथील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. माजी पंचायत समिती सदस्य सुहास गोलांडे, माजी उपसरपंच प्रकाश हगवणे, देहू संस्थान माजी विश्‍वस्त ह.भ.प. विश्‍वजीत मोरे महाराज यांनी त्यांच्या समर्थकांसह तळेगाव दाभाडे येथे भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.

देहूत बाळा भेगडे यांचे जल्लोषात स्वागत
देहूत सर्वत्र भक्‍तीमय वातावरणात भेगडे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. बाळाभाऊंचा स्वभाव हा सर्वांशी प्रेमळपणे वागण्याचा असून ते हसतमुख आहेत. एखाद्याला काही वर्षानंतर पाहिले तरी त्यांना आपलेपणाने ओळख देतात, या भाऊंच्या प्रेमळ स्वभावामुळे बाळा भाऊ सर्वांना आपलेसे वाटतात. तालुक्‍याचा विकास केवळ तेच करू शकतात, असे मत देहूचे शिवसेना प्रमुख सुनील हगवणे यांनी यावेळी व्यक्‍त केले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.