लोणावळा – सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाचे स्वागत पर्यटनस्थळांवर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक लोणावळा, खंडाळा व मावळ भागात दाखल झाले होते. त्यामुळे गेली आठवडाभरात मावळ तालुक्यात कोट्यवधी रूपयांची उलाढाल झाली. स्थानिक व्यापारी, लहान-मोठे व्यावसायिकांना याचा फायदा झाला.
दोन वर्षे करोना निर्बंधांमुळे मावळातील पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. मात्र,करोनाचा प्रभाव कमी झाल्याने, यंदा सर्व सण निर्बंधमुक्त साजरे करण्यात आले. त्यामुळे ख्रिसमस, सरते वर्ष व नववर्षाच्या स्वागतासाठी पुणे-मुंबईच्या पर्यटकांची पहिली पसंती लोणावळा व खंडाळ्याला मिळाली. आठवडाभरापासूनच पर्यटक लोणावळा, खंडाळ्यात दाखल होत होते
निर्बंधमुक्त वातावरणात सरत्या वर्षाला निरोप व नविन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली होती. लोणावळ्यातील हॉटेल व खाजगी बंगले तसेच फार्महाऊस, पवनानगर भागातील टेन्ट पर्यटकांनी फुल्ल झाले होते. प्रत्येक ठिकाणी पर्यटकांसाठी खास पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी लोणावळा व खंडाळा शहरांपेक्षा पर्यटकांनी पवना धरण परिसराला मोठी पसंती दिल्याने तो परिसर अक्षरशः गजबजला असून लाखो पर्यटक त्या भागात दाखल झाले होते.
लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग सकाळपासून वाहतूककोंडी ठप्प झाला होता. पवनानगर भागातील ठाकूरसाई व परिसरात मोठी वाहतूककोंडी झाली होती. मात्र पर्यटकांच्या चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह पहायला मिळत होता. प्रत्येकजण सेलिब्रेशनच्या मुडमधे असल्याचे चित्र पहायला मिळाले. मोठ्या संख्येने पर्यटक आल्याने लहान मोठे सर्वच व्यावसायिक आनंदित असल्याचे पहायला मिळाले. पोलीस प्रशासनाकडून देखील जागोजागी बंदोबस्त नियुक्त करत पर्यटकांची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेतली होती.
चिक्कीची मोठी खरेदी
नववर्षाचे स्वागत केल्यानंतर परतीच्या प्रवासाला निघालेल्या पर्यटकांनी लोणावळ्याची प्रसिद्ध चिक्की खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. बाराही महिने चिक्कीला मोठी मागण अिसते. तर पर्यटकांच्या मोठ्या गर्दीमुळे चिक्कीची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. याचा किरकोळ विक्रेत्यांनादेखील मोठा फायदा झाला.
वर्षा अखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी झुंबड
खंडाळा येथील सनसेट पॉइंटवरून सूर्यास्ताचे विलोभनीय रूप दिसते. लोणावळ्याला आलेले भेट याठिकाणी आवर्जुन भेट देतात. त्यामुळे वर्षाअखेरचा सूर्यास्त पाहण्यासाठी खंडाळा येथील सनसेट पॉईटवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सरत्या वर्षांच्या सूर्यनारायणाची छबी टिपण्यासाठी सर्व पर्यटकांचे मोबाइलदेखील सरसावले होते.