पिंपरी – फक्त पशू-पक्षीच नव्हे तर मानवासाठीही नायलॉन मांजा धोकादायक ठरत आहे. त्यामुळे या मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र शहरातील दुकानदारांकडून ओळखीच्याच ग्राहकांना नायलॉन मांजा दिला जात आहे. तर या मांजाची ऑनलाइन खुलेआम विक्री होत असल्याचे दिसून येत आहे.
मकर संक्रात सणाच्यावेळी पतंग उडविण्याची परंपरा आहे. मात्र एकमेकांची पतंग काटण्यासाठी नायलॉन मांजाचा मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो. हा मांजा फक्त पशूपक्षीच नव्हे तर मानवासाठीही जीवघेणा ठरत आहे. पाच वर्षापूर्वी नाशिकफाटा येथील उड्डाणपुलावर एका तरुणीचा नॉयलॉन मांजाने गळा कापून मृत्यू झाला होता. त्यानंतर अनेकजण जखमी झाल्याचेही वेळोवेळी समोर आले आहे. यामुळे फक्त पिंपरी चिंचवड शहरातच नव्हे तर राज्यात या मांजाच्या वापरावर व विक्रीवर बंदी आणण्यात आली आहे.
नायलॉन मांजावर असलेली बंदी केवळ कागदावरच उरली असल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरात सांकेतिक शब्दांचा वापर करून किंवा ओळखीच्या व्यक्तींना या नायलॉन मांजाची विक्री होत आहे. अनेकजण प्रशासनाची नजर चुकविण्यासाठी दुकानांऐवजी सार्वजनिक जागेत किंवा घरात रात्रीच्या वेळी नायलॉन मांजाची विक्री करीत आहेत. परिणामी, मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नायलॉन मांजाने “कमबॅक’ केल्याने अपघाताचाही धोका वाढला आहे.
शहरातील पिंपरी, भोसरी, निगडी आणि विशेषतः झोपडपट्टी भागाजवळील काही ठिकाणी कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे. गल्लीबोळात असलेला मांजाचा गुंता आणि लहानग्यांच्या हातात दिसणाऱ्या मांजामुळे हा काळाबाजार समोर येत आहे. या विक्रीमध्ये “गट्टू’, “पाकीट’, “पक्का धागा’ यांसारख्या सांकेतिक शब्दांचा वापर केला जात आहे. एकीकडे प्रशासनाकडून नायलॉन मांजाचा वापर न करण्याचे आवाहन केले जात आहे. तर दुसरीकडे शहरात अनेक भागांत नायलॉन मांजाचा सर्रास वापर होताना दिसून येत आहे. त्यामुळे नायलॉन मांजाचा काळाबाजार होत असल्याचेही स्पष्ट होत आहे. ग्राहकाकडून कोणताही धोका नसल्याची मध्यस्थाला पूर्ण खात्री पटल्यानंतरच रात्री साडेनऊनंतर मांजाची विक्री करण्यात येत आहे.
अनेक ई-कॉमर्स साइट्सवर उपलब्ध
उद्योगांमध्ये कामांसाठी नायलॉनचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. ऑनलाइन विक्रीच्या अनेक ई-कॉमर्स साइट्सवर नायलॉनच्या धाग्यांची खुलेआम विक्री होत आहे. मात्र, त्या धाग्यांचा वापर नायलॉन मांजा म्हणून केला जात आहे. त्यामुळे ज्यांना बाजारातून मांजा खरेदी करणे शक्य नाही ते ग्राहक ऑनलाइन नायलॉनची खरेदी करीत आहे. ऑनलाइन नायलॉन मांजा खरेदी करणाऱ्या ग्राहकांवर प्रशासन अंकुश ठेवणार कसा, असाही प्रश्न आहे.