पुणे – महापालिकेमार्फत प्री आयसोलेशन सुरू केले आहे. शहरातील सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी त्यांचे दवाखाने सुरू ठेवायचे आहेत, असे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
रुग्णांना सर्दी, खोकला, घसादुखी या आजाराची लक्षणे असल्यास त्यांना बोपोडी येथील कै. द्रौपदीबाई मुरलीधर खेडेकर हॉस्पिटल येथे पाठवण्यात यावे, अशाही सूचना करण्यात आल्या आहेत.
महापालिकेमार्फत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सर्व्हेक्षण करणाऱ्या नर्सेसना सर्दी, खोकला, घसादुखी झाल्यास त्यांनाही वरील ठिकाणीच पाठवण्याची व्यवस्था करावी.या रुग्णालयातील पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर एकूण 25 बेडची प्री आयसोलेशन सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे.
तसेच त्या अनुषंगाने तेथे मनुष्यबळही उपलब्ध करून देण्यात आले असून, औषधोपचाराची सोयही करण्यात आली आहे. येथे तपासणीदरम्यान एखादा रुग्ण करोनाबाधित असल्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला, तर त्याला त्वरित नायडू सांसर्गिक रुग्णालयात प्रोटोकॉलनुसार ऍम्ब्युलन्सने पोहोचवण्यात येणार आहे, असे आयुक्तांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.