देशभरात करोनाच्या परिस्थितीमुळे “एनटीए’चा निर्णय
पुणे – राष्ट्रीय स्तरावरील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या जेईई मेन्स परीक्षेलाही करोना विषाणूचा फटका बसला आहे. राज्यात दि.5 ते 11 एप्रिलदरम्यान होणारी ही परीक्षा पुढे ढकलली होती. आता ही परीक्षा मेच्या शेवटच्या आठवड्यात घेण्याचे प्रस्तावित असल्याचे असल्याचे नॅशनल टेस्टिंग एजन्सीने परिपत्रकाद्वारे सांगितले. येत्या आठवड्यात करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर त्याबाबतचे वेळापत्रक लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
पूर्व नियोजनानुसार जेईई मेन परीक्षा एप्रिल महिन्यात दि. 5, 7, 9 आणि 11 रोजी राज्यातील विविध शहरांमध्ये पार पडणार होती. मात्र, देशभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेले वातावरण लक्षात घेऊन ही परीक्षा तूर्तास स्थगित करण्याचा निर्णय नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतला आहे. या परीक्षेच्या नवीन तारखा 31 मार्च रोजी जाहीर केले जाणार असल्याचे यापूर्वीच जाहीर केले होते. त्यानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीने आज परीक्षेसंदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केले.
सध्याची करोनाची परिस्थिती पाहता एप्रिल महिन्यात जेईई परीक्षा घेणे शक्य नाही. मात्र मेच्या शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेण्याचे प्रस्तावित आहे. याचा तारखा देशातील करोनाची स्थिती लक्षात घेऊन काही आठवड्यात जाहीर केले जातील. मात्र, जेईई मेन परीक्षेसाठी प्रवेशपत्र 15 एप्रिलनंतर “एनटीए’च्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे एजन्सीने म्हटले आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन एनटीएने केले आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांना आता वाढीव वेळ मिळणार असून, त्यासाठी ऑनलाइन अभ्यास करता येणार आहे.