शरद पवार, अजित पवारांच्या समर्थनार्थ फलकबाजी
पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये फूट पाडत भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला गेलेल्या नेते अजित पवार यांच्या या बंडानंतर पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. नगरसेवकांवर चांगली पकड असल्याने काही नगरसेवकांनी सावध पवित्रा घेतला असला तरी आता अजित पवारांच्या समर्थनार्थ फलकबाजी सुरू असतानाच अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी “80 वर्षांच्या योध्यासोबत’ असे बॅनर झळकविले आहेत. शहरात सुरू असलेल्या या प्रकारामुळे पक्षात उभी फूट पडल्याचे रविवारी (दि. 24) अधोरेखित झाले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील राजकारणावर विशेषत: पक्षाच्या पदाधिकारी व नगरसेवकांवर अजित पवार यांचीच गेली अनेक वर्षे पकड आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडची संपूर्ण जबाबदारी अजित पवार यांच्यावरच सोपविलेली होती. त्यामुळे पदाधिकारी निवडीपासून तिकीट वाटपापर्यंत सर्व निर्णय हे अजित पवारच घेत आले आहेत. त्यामुळे शहरात अजित पवारांच्या समर्थकांचीच संख्या मोठी मानली जात होती.
मात्र अजित पवार यांनी पक्षात बंड करून भाजपला साथ देण्याचा निर्णय घेत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शहरात अजित पवारांच्या या निर्णयाविरोधात असंतोष व्यक्त करण्यात आला. शनिवारी सर्वांनीच अस्ते कदम टाकत “वेट ऍण्ड वॉच’ची भूमिका घेतली होती. मात्र रविवारी अनेकांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या समर्थनार्थ फलकबाजी केली आहे. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी 30 नोव्हेंबरनंतर भूमिका जाहीर करू असे शनिवारीच स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी पक्षाबरोबर असल्याचे सांगतानाच आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवण्याचा प्रयत्न केला होता.
माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मात्र शरद पवार यांच्या समर्थनार्थ जाहीर पुढाकार घेत जाहीर भूमिका घेतली होती. आज रविवारी यामध्ये काही नगरसेवकांनी जाहीर फलकबाजी करीत अजित पवारांना समर्थन जाहीर केले आहे. यामध्ये सर्वाधिक फलकबाजी रावेतचे नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी केली आहे. तर पिंपळे गुरव, पिंपळे निलख परिसरात शरद पवार यांच्या समर्थनार्थ फलक लावल्याने शहर राष्ट्रवादीत फाटाफूट होण्यास सुरुवात झाल्याचे आज स्पष्ट झाले.
सर्वसामान्यांमध्ये अजित पवारांविरोधात रोष
उपमुख्यमंत्री पद आणि स्वत:चा बचाव करण्यासाठीच अजित पवार हे भाजपासोबत गेल्याचा सुरू आज शहरात उमटत होता. सोशल मीडियावर अजित पवार यांच्या विरोधात आक्रोश दिसून आला. जनतेच्या कल्याणासाठी असे गोंडस नाव देऊन स्वत:चा स्वार्थ साधणाऱ्या अजित पवारांना जनता कधीही स्वीकारणार नसल्याच्या पोस्ट शहरात फिरत होत्या.
लढायचे तरी कोणाविरोधात?
पिंपरी-चिंचवड शहरात सन 2014 पासून आतापर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशी राजकीय लढाई सुरू आहे. क्रमांक चारवर असलेला भाजपा शहरात प्रथम क्रमांकावर पोहोचल्यानंतर विधानसभा आणि महापालिकेत राष्ट्रवादीची लढाई भाजपासोबतच राहिली आहे. गेल्या पाच वर्षांपासून ज्या लोकांविरोधात लढत आलो आता त्यांच्याशीच अजित पवारांनी हातमिळवणी केल्यामुळे लढायचे तरी कोणासोबत असा प्रश्न कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नगरसेवकांना पडला आहे.