विमा, बिगरबॅंकिंग वित्त कंपन्या, औषधे, एअरलाईन्स कंपन्यांकडे परदेशी गुंतवणूकदारांची नजर फिरली आहे.गेली काही वर्षे परदेशी गुंतवणूकदार नावाजलेल्या, बड्या कंपन्यांच्या शेअरमध्येच गुंतवणूक करत होते. मात्र आता हा ट्रेंड बदलत असून नावीन्यपूर्ण व्यवसाय करणाऱ्या मिडकॅप गटातील अनेक कंपन्यांकडे परदेशी गुंतवणूकदारांचे लक्ष गेले आहे.
अशा कंपन्यांकडून भविष्यात चांगला परतावा मिळण्याच्या शक्यतेने ते या कंपन्यांच्या शेअरची खरेदी करत आहेत. सप्टेंबरमध्ये संपलेल्या तिमाहीत या परदेशी कंपन्यांनी 60 हून अधिक मिडकॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने एचडीएफसी लाईफ, अपोलो ट्रायकॉट ट्यूब्ज, येस बॅंक, वेलस्पन कॉर्प, फोर्टिस हेल्थकेअर, एरिस लाईफसायन्सेस, डिशमॅन कार्बोजिन अमिक्स या कंपन्यांचा समावेश आहे.
गेल्या महिनाभरात परकीय संस्थात्मक गुंतवणूकदारांनी मिडकॅप वर्गातील चांगल्या कंपन्यांच्या व्यवस्थापनाची भेट घेतलेली आहे. अबर्दीन स्टॅंडर्ड इन्व्हेस्ट्मेंट, मॉर्गन स्टॅन्ले, सैफ पार्टनर्स, बेअरिंग, हेलिऑस, विल्यम ब्लेअर, ज्युलिअस ब्लेअर, कोलंबिया थ्रेडनीडल्, ब्रुकफिल्ड, नोमुरा या प्रमुख संस्थांचा समावेश आहे. त्यांनी ज्या कंपन्यांच्या व्यवस्थापनांची भेट घेतली त्यामध्ये आयआयएफएल फायनान्स, पॉलिकॅब इंडिया, नारायण हृदयालय, क्रेडिट अक्सेस ग्रामीण, एयू स्मॉल फायनान्स बॅंक, स्पंदन स्फूर्ती, अडव्हान्स्ड एन्झाईम, सुंदरम फास्नर्स, श्रीराम ट्रान्सपोर्ट, आवास फायनार्न्स अशा कंपन्यांचा समावेश आहे. आयआयएफएलमधील परकीय संस्थांची गुंतवणूक 24.3 टक्क्यांवर पोचली आहे.
कंपनीचा शेअर महिनाभरात 34.7 टक्क्यांनी वाढला आहे. नारायण हृदयालयमध्ये ही गुंतवणूक 11.8 टक्के एवढी आहे. या कंपनीचा शेअर महिनाभरात 27.8 टक्क्यांनी वधारला आहे. एयू स्मॉल फायनान्स बॅंकेच्या व्यवस्थापनाची सैफ पार्टनर्स, टी रोवे, कोलंबिया थ्रेडनीडल या संस्थांच्या अधिकाऱ्यांनी गेल्या महिनाभरात भेट घेतली.
बॅंकेतील परकीय गुंतवणूक आता 25.5 टक्के आहे. बॅंकेचा शेअर महिन्यात 24.9 टक्क्यांनी वाढून 809 रुपयांच्या आसपास पोचला आहे. श्रीराम ट्रान्सपोर्टच्या व्यवस्थापनाची टीचर रिटायरमेंट सिस्टिम ऑफ टेक्सास, यूबीएस, आमान्सा, टी रोवे या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली. या कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या महिनाभरात 2.7 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.