Rohit Sharma, Chennai Super Kings : इंडियन प्रीमियर लीगचा 17वा सीझन म्हणजेच IPL 2024 चा हंगाम 22 मार्चपासून सुरू होणार आहे. लीगचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. आगामी आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा ( Rohit Sharma ) चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे. वास्तविक, मुंबई इंडियन्सने पाच वेळा विजेत्या कर्णधाराला त्याच्या पदावरून हटवून स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे संघाची कमान सोपवली आहे. त्यानंतर रोहितबाबत अनेक दावे केले जात आहेत. आता माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने ( Ambati Rayudu ) त्याच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे.
आयपीएलमध्ये मुंबई आणि चेन्नईकडून खेळलेला माजी क्रिकेटपटू अंबाती रायडूने म्हटले आहे की, रोहित शर्मा आगामी काळात चेन्नई सुपर किंग्जकडून खेळू शकतो. रोहित हा चेन्नईचा पुढचा कर्णधार असेल असेही त्याने सांगितले. रायुडू एका मुलाखतीत म्हणाला की, “मला रोहितला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना पाहायचे आहे. धोनीच्या निवृत्तीनंतर रोहित चेन्नईचे नेतृत्वही करू शकतो. रोहित चेन्नईसाठी खेळला तर खूप चांगले होईल. तो पुढील 5-6 वर्षे आयपीएलमध्ये आरामात खेळू शकतो. ”
रायुडू पुढे म्हणतो, “जर रोहितला नेतृत्व करायचे असेल तर तो कोणत्याही संघाचे नेतृत्व करू शकतो. मात्र, हा निर्णय घेण्याचा अधिकार फक्त रोहितला आहे. त्याला नेतृत्व करायचे की नाही हा त्याचा निर्णय असेल. चेन्नईत तो कर्णधार असेल की नाही, हा निर्णयसुध्दा पुर्णपणे त्यांच्यावर अवलंबून असेल.”
रायडूने एका मुलाखतीत सांगितले की, ‘रोहितला यावर्षी कर्णधारपदी ठेवायला हवे होते आणि हार्दिकला कदाचित वर्षभरानंतर कर्णधारपद दिले गेले असते. रोहित अजूनही टी-20 मध्ये भारताचे नेतृत्व करत आहे. मला वैयक्तिकरित्या असे वाटते की मुंबई इंडियन्सने हा निर्णय घाईघाईने घेतला, परंतु कदाचित त्यांना चांगले माहित असेल. त्यामुळे हा हंगाम त्यांच्यासाठी कठीण जाणार आहे. गुजरात टायटन्सचा सेटअप वेगळा होता. मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपी गोष्ट नाही कारण संघात अनेक स्टार खेळाडू आहेत. खूप दबाव आहे आणि प्रत्येकजण ते हाताळू शकत नाही.
रायुडूला रोहितला सीएसकेमध्ये पाहायचे आहे
यानंतर रायडूने एक मोठे विधान केले आणि सांगितले की, मला रोहितला चेन्नई सुपर किंग्जमध्ये जाताना पाहायचे आहे. एमआयकडून खेळताना त्याने सर्व प्रकारचे यश मिळवले आहे. रोहित अजूनही पाच-सहा वर्षे खेळू शकतो असा विश्वास रायडूनं व्यक्त केला आहे. अंबाती रायुडूला असे वाटते की, तो ‘यलो आर्मी’ सोबत नवीन अध्याय उघडण्याचा प्रयत्न करू शकतो आणि हे पाहणे रोमांचक असेल.
रोहितने मुंबई इंडियन्ससाठी पटकावले आहेत पाच विजेतेपद…
आता रोहित शर्मा आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतो की नाही तसेच दुसरीकडे, 2025 लिलावात रोहित शर्मा दिसला तर चेन्नई सुपर किंग्स त्याला खरेदी करणार का? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे, परंतु आयपीएलच्या इतिहासातील तो सर्वोत्तम कर्णधार आहे यात शंका नाही. रोहितने आपल्या कर्णधारपदाखाली मुंबई इंडियन्ससाठी पाच विजेतेपद पटकावले आहेत.