Indian Premier League 2024 Rohit Sharma & Hardik Pandya : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अलीकडेच पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडचा 4-1 असा पराभव केला. आता भारतीय खेळाडू आयपीएल 2024 साठी मैदानात उतरतील. मात्र स्पर्धेपूर्वी रोहित शर्माच्या रूपाने मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसू शकतो. यावेळी रोहित शर्मा दुखापतीमुळे हार्दिकच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स संघातून बाहेर असू शकतो.
इंग्लंडविरुद्ध धर्मशाला येथे खेळल्या गेलेल्या मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रोहित शर्मा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला नव्हता. भारतीय कर्णधाराने पाठीच्या दुखापतीची माहिती दिली होती. रोहित शर्माच्या जागी जसप्रीत बुमराहने धर्मशाला कसोटीत तिसऱ्या दिवशी कर्णधारपद भूषवले. बीसीसीआयने रोहित शर्माबाबत हे अपडेट दिले होते.
तथापि, रोहित शर्माची समस्या गंभीर आहे की किरकोळ हे अपडेटमध्ये स्पष्ट करण्यात आले नाही. जर भारतीय कर्णधाराला आणखी अडचणींचा सामना (दुखापतीचा त्रास) करावा लागला तर तो आयपीएल 2024 ला मुकू शकतो. मात्र, आयपीएलमध्ये खेळणे किंवा न खेळण्याबाबत रोहित शर्माबाबत अद्याप कोणतेही अधिकृत अपडेट मिळालेले नाही. आता रोहित शर्मा नवीन कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2024 खेळू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
रोहित शर्माकडून काढून घेतले आहे कर्णधारपद…
दरम्यान, आयपीएल 2024 च्या आधी मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळला आणि हार्दिक पंड्याला गुजरात टायटन्सकडून खरेदी केले. काही दिवसांनंतर, 2024 मध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा नव्हे तर हार्दिक पांड्या मुंबईची धुरा सांभाळणार असल्याची घोषणा देखील केली. याआधी हार्दिक पांड्याने गुजरात टायटन्सचे दोन मोसमात नेतृत्व केले होते. रोहित शर्माने आपल्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सला पाच वेळा विजेतेपद मिळवून दिले, पण तरीही रोहितकडून कर्णधारपद काढून घेण्यात आले.