Mobile Pashusalla App । Phule amrutkal : शेतीसोबत पशुपालन करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पशुपालन करताना तुम्ही योग्य ते नियोजन करणे गरजेचे आहे. अशातच आता सरकारने शेतकऱ्यांना भेट दिली आहे. सरकारने खास शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धनासाठी ॲप तयार केले आहे. त्याचे नाव ‘फुले अमृतकल’ पशुसल्ला मोबाईल ॲप आहे.
जे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या देशी गाय संशोधन प्रशिक्षण केंद्रांतर्गत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभागाने विकसित केली आहे. महाराष्ट्राचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सुरुवात केली. त्याची खासियत आणि गरज त्यांनी सांगितली आहे.
कृषीमंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, हवामानातील बदलामुळे वादळ, अतिवृष्टी, ढगफुटी, तापमानात वाढ, उष्णतेची लाट, अनपेक्षित पाऊस असे स्वरूप सातत्याने पाहायला मिळत आहे. याचा परिणाम जनावरांसाठी चारा आणि पाण्याच्या तरतुदीवर तर होतोच शिवाय पशुधनाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होतो.
संकरित गाई व म्हशींच्या दुध उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे गायींच्या दुग्धोत्पादनात 5 ते 20 टक्के घट झाल्याचे निदर्शनास आले आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी हे ॲप महत्त्वाची भूमिका बजावेल. असं ते म्हणाले.
‘या’ ॲपचा फायदा पशुपालकांना कसा होईल? । Mobile Pashusalla App
या ॲपच्या माध्यमातून शेतकरी जनावरांच्या उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी वेळोवेळी सावली देऊ शकतात, योग्य वायुवीजन ठेवू शकतात, पिण्यासाठी थंड पाणी उपलब्ध करून देऊ शकतात, पंखा किंवा फॉगर यंत्रणा आपोआप चालू करू शकतात आणि संतुलन राखण्यासाठी आहार नियोजन इत्यादी उपाययोजना करू शकतात.
ॲपचा वापर असा करावा – । Mobile Pashusalla App
या ॲपचा वापर करण्यासाठी गुगल प्ले स्टोअर वरून Phule Amrutkal हे ॲप डाऊनलोड करावे. (लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi ) त्यानंतर नोंदणी करून मोबाईल नंबर टाकावा. ओटीपी प्राप्त झाल्यानंतर पत्ता व लोकेशन टाकून ॲप चालू करावे. हव्या असलेल्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तपमान आद्रता निर्देशांक मिळतो.
त्याद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळू शकतो. हे ॲप ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान व आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे शेतकऱ्यांना व्यक्तिगत सल्ला व सूचना पुरवते.