Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru, Match Result : आज आयपीएल 2024 च्या 58 व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने-सामने होते. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. हा सामना दोन्ही संघांसाठी करो किंवा मरो असा होता. अशा महत्वाच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा 60 धावांनी पराभव केला आहे.प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने 20 षटकांत सात गडी गमावून 241 धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ 17 षटकांत 181 धावांवर गारद झाला.
पंजाबचा संघाकङून फलंदाजीत रिले रुसोने सर्वाधिक 61 धावा केल्या. याशिवाय शशांक सिंगला 37 आणि सॅम करनला 22 धावा करता आल्या. सिराजने तीन गडी बाद केले. तर स्वप्नील सिंग, लोकी फर्ग्युसन आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.
या पराभवासह पंजाबचा संघ आयपीएल 2024 मधून बाहेर पडला आहे. 12 सामन्यांनंतर त्यांचे आठ गुण आहेत आणि संघ जास्तीत जास्त 12 गुण मिळवू शकतो, जे प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाही. प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पंजाब हा मुंबईनंतरचा दुसरा संघ आहे.त्याचबरोबर आरसीबीने या विजयासह प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. 12 सामन्यांनंतर त्याचे 10 गुण आहेत. संघ जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. मात्र, तरीही त्यांना इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागणार आहे. बेंगळुरूचे पुढील दोन्ही सामने चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहेत. 12 मे रोजी संघ दिल्ली कॅपिटल्स आणि 18 मे रोजी चेन्नई सुपर किंग्जशी खेळेल.
तत्पूर्वी, पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करनने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 20 षटकांत 7 बाद 241 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती.
Our 4th highest total in the IPL and the highest total for any team at the Dharamshala in the IPL. 🔥
12th Man Army, how do you think we have done so far? 🙌#PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2024 #PBKSvRCB pic.twitter.com/fRcBu4s8xT
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) May 9, 2024
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसाठी विराट कोहलीने 47 चेंडूत सर्वाधिक 92 धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत 7 चौकार आणि 6 षटकार मारले. याशिवाय रजत पाटीदारने 23 चेंडूत 55 धावांचे योगदान दिले. त्याने आपल्या खेळीत 3 चौकार आणि 6 षटकार मारले. त्याचवेळी कॅमेरून ग्रीनने शेवटच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजीचे प्रदर्शन सादर केले. कॅमेरून ग्रीनने 27 चेंडूत 46 धावा केल्या. या अष्टपैलू खेळाडूने आपल्या खेळीत 5 चौकार आणि 1 षटकार लगावला. हर्षल पटेलच्या गोलंदाजीवर 7 चेंडूत 18 धावा करून दिनेश कार्तिक पॅव्हेलियनमध्ये परतला.
नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली होती. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सलामीवीर फाफ डू प्लेसिसने 7 चेंडूत 9 धावा करून माघारी परतला. यानंतर विल जॅक 7 चेंडूत 12 धावा करून पॅव्हेलियनमध्ये गेला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे दोन फलंदाज 43 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतले होते. मात्र यानंतर विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्यात 76 धावांची चांगली भागीदारी झाल्यानं संघाला मोठी धावसंख्या उभारता आली.
पंजाब किंग्जच्या गोलंदाजांबद्दल बोलायचे तर हर्षल पटेल हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. हर्षल पटेलने 4 षटकांत 38 धावांत 3 फलंदाज बाद केले. विदवथा कावरप्पा याला 2 यश मिळाले. याशिवाय अर्शदीप सिंगने विराट कोहलीची महत्त्वाची विकेट घेतली. तर कर्णधार सॅम करनने रजत पाटीदारला बाद केलं. सॅम करनने 3 षटकात सर्वाधिक 50 तर त्यापाठोपाठ राहुल चहरने एकही विकेट न घेता 3 षटकात 47 धावा दिल्या. अर्शदीपने 3 षटकात 41 धावा दिल्या.