मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईतील सर्व नियोजित दौरे रद्द करून राजधानी दिल्ली येथे दाखल झाले आहेत. पवार यांच्यासोबत त्यांचे विश्वासू सहकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे देखील आहेत. अशातच विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील राजधानीत उपस्थित असल्याने पवारांच्या अचानक ‘दिल्ली दौऱ्याविषयी’ राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
अशातच आता समाज माध्यमांवर एक फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा चर्चा करताना दिसतायेत. शरद पवार यांच्या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राष्ट्रवादी-भाजपदरम्यान काही शिजतंय काय? अशा दबक्या आवाजात सुरु असलेल्या चर्चेला या फोटोमुळे चांगलीच हवा मिळाली आहे. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसने या फोटोबाबत खुलासा केला आहे.
शहा-पवार-फडणवीस यांचा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला तो फोटो राष्ट्रवादीने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर ट्विट केला असून हा फोटो मॉर्फ (बनावट) असल्याचा खुलासा केला आहे. या फोटोसोबत लिहलेल्या संदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने, ‘अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पडण्याच्या गाजल्या सुरु झाल्या आहेत. असे मॉर्फ फोटो करणाऱ्यांना आता माफी नाही. पोलिसांनी त्यांना शोधून काढावे’ अशी विनंती केली आहे.
डिजिटल प्रभातने या फोटोची छाननी केली असता, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केलेल्या फोटोसोबत छेडछाड करून हा फोटो तयार करण्यात आल्याचं आढळलं. देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्ली येथे भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी याबाबतच फोटो ट्विट केला. फडणवीस यांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये गृहमंत्री शहा खुर्चीवर बसले असून फडणवीस त्यांच्या बाजूला सोफ्यावर बसल्याच दिसतंय.
Had a courtesy meeting with our leader, Hon Union Home Minister @AmitShah ji in New Delhi.
आमचे नेते, मा. केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची नवी दिल्ली येथे सदिच्छा भेट घेतली. pic.twitter.com/ACAgMbgFWI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 26, 2021
फडणवीस यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये छेडछाड करत शरद पवार यांचे छायाचित्र या फोटोमध्ये जोडण्यात आले आहे. शरद पवार हे देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला बसून चर्चा करीत असल्याचा आभास या बनावट फोटोतून करण्यात आला आहे.
अधिवेशनाच्या तोंडावर सरकार पाडण्याच्या ‘गजाल्या’ सुरू झाल्यात. त्यासाठी ‘असले’ मॉफ़् केलेले बचकांडे हातखंडे. पण आता मॉफ़् ला माफी नाही.
फसव्या फोटोशॉप जल्पकांचा (ट्रोल्स) शोध घेणं अवघड नाही. @MahaCyber1 असले छुपे छद्मउद्योग करणाऱ्यांना शोधून काढावे ही विनंती.@maharashtra_hmo pic.twitter.com/wo4t3YdeXI— NCP (@NCPspeaks) November 26, 2021