आनंद सोहळ्यात मान्यवरांच्या शुभेच्छांनी भारावले वातावरण
शेकडोंच्या संख्येने वाचक, विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहाच्या प्रांगणात रंगली गप्पांची मैफिल
‘डिजिटल प्रभात’च्या माध्यमातून शुभेच्छा देत सद्यस्थितीवर भाष्य
पिंपरी – निष्पक्ष आणि निर्भीड पत्रकारितेची परंपरा जोपासणाऱ्या दैनिक “प्रभात’च्या 92 व्या वर्धापनदिनानिमित्त पिंपरी-चिंचवड विभागीय कार्यालयाचा स्नेहमेळावा शुभेच्छा, अभिनंदन आणि कौतुकाने भारावून टाकणारा ठरला. यानिमित्त बुधवारी (दि.28) सायंकाळी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहाच्या प्रांगणात आयोजित स्नेहमेळाव्यात शेकडोंच्या संख्येने वाचक तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवित “प्रभात’शी असलेले ऋणानुबंध अजून घट्ट केले. यावेळी राजकीय, उद्योग, व्यापार, प्रशासकीय, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रांतील मान्यवरांसह वकील, डॉक्टर, अभियंता, वृत्तपत्र विक्रेते यांनी आवर्जून भेट देत “प्रभात’ला शुभेच्छा दिल्या. तसेच “डिजिटल प्रभात’च्या माध्यमातून दैनिक “प्रभात’ सोबतचे ऋणानुबंध व्यक्त केले.
सायंकाळच्या आल्हाददायक आणि प्रसन्न वातावरणात दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. दैनिक “प्रभात’चे व्यवस्थापकीय संचालक आनंद गांधी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्याला सर्वच क्षेत्रांतील मान्यवर आवर्जून उपस्थित होते. सोबतच दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, व्यवस्थापक सी. ए. रविकुमार इंडी, मार्केटिंग मुख्य व्यवस्थापक प्रवीण पारखी आदी उपस्थित होते.
सायंकाळच्या वेळी गुलाबी थंडीत “प्रभात’च्या वाचकांनी गप्पांची मैफिल रंगविली. “प्रभात’च्या माध्यमातून अनेकांच्या नव्याने ओळखी झाल्या, तर काही जुन्या परिचितांच्या अनेक दिवसांनंतर गाठीभेटी झाल्या. यावेळी सर्वांनी “प्रभात’सोबतच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच “डिजिटल प्रभात’च्या माध्यमातून शुभेच्छा देत सद्यस्थितीवर आपले विचार आणि अपेक्षाही व्यक्त केल्या.