पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेची नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यासाठी 286 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हैद्राबाद येथील केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदाराकडून हे काम करुन घेण्यास आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी मंगळवार (दि. 27) झालेल्या स्थायी समितीच्या सभेत मान्यता दिली. कामाचा कालावधी तीन वर्षांचा असणार आहे. आजच्या मान्यतेमुळे पुढील तीन वर्षांत महापालिकेची नवीन इमारत उभी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजासाठी चिंचवड, ऑटो क्लस्टर समोरील आरक्षण क्रमांक 181 ड (पै) या सात एकराच्या भूखंडावर 13 मजली प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने 312 कोटी 20 लाख 32 हजार 838 रुपये खर्चाची निविदा 23 मे 2022 रोजी प्रसिद्ध केली होती. सुरुवातीली निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पालिका प्रशासनाने तीनवेळा मुदतवाढ दिली होती. दिलेल्या मुदतीत 5 ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. त्यातील 3 ठेकेदार अपात्र झाले. तर, केएमव्ही प्रोजेक्ट हैदराबाद आणि बी.जी शिर्के या 2 ठेकेदारांची निविदा पात्र ठरली.
केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड हैद्राबाद या ठेकेदाराने रॉयल्टी व मटेरीयल टेस्टींग चार्जेस वगळून 8.19 टक्के कमी म्हणजे 286 कोटी रुपयांची निविदा सादर केली होती. संबंधित ठेकेदार मुदतीमध्ये काम करण्यास सक्षम असल्याने आयुक्त सिंह यांनी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. केएमव्ही प्रोजेक्ट लिमिटेड या ठेकेदाराकडून रॉयल्टी, मटेरियल टेस्टींग चार्जेसह दोनशे कोटी 86 लाख रुपयांत काम करुन घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास आयुक्त सिंह यांनी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता
दिली आहे.
300 नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था
महापालिकेची चिंचवड स्टेशन या ठिकाणी 35 एकर जागा आहे. त्यापैकी 7 एकर जागेत 13 मजली प्रशस्त पर्यावरणपूरक इमारत उभारण्याचे नियोजन आहे. भविष्यातील 50 वर्षांचे नियोजन करून या इमारतीचा आराखडा तयार करण्यात आला. महापालिकेच्या विविध विभागासह पदाधिकाऱ्यांची दालने असतील. प्रशस्त सभागृह, मीटिंग हॉल, कॅण्टीन, स्वच्छतागृह आणि इतर सोयी असणार आहे. उर्वरित जागेत सिटी सेंटर उभारण्यात येणार आहे. पाच मजली स्वतंत्र इमारतीमध्ये वाहनतळ असणार आहे. त्यात 500 मोटारी आणि दीड हजार दुचाकी पार्क करता येणार आहेत. तर, महापालिका सभागृहात 300 नगरसेवकांना बसण्यासाठी आसन व्यवस्था असणार आहे. इमारतीच्या गच्चीवर हेलिपॅड असणार आहे.
आताच्या इमारतीत जागा पडतेय अपुरी
सध्याची पालिकेची इमारत अपुरी पडत आहे. अनेक विभागांची कार्यालये इतर इमारतींमध्ये स्थलांतरित केली आहेत. वास्तुविशारद लॅण्डमार्क डिझाइन ग्रुप यांनी 17 डिसेंबर 2019 रोजी इमारतीचा विविध पर्यायांतील आराखडा सादर केला होता. 24 हजार 544 चौरस मीटर क्षेत्राच्या भूखंडावर त्यांनी नऊ मजली इमारतीचा आराखडा तयार केला होता.