पुणे – मागील दोन महिन्यांपासून शहरात करोनाने उद्रेक माजविला असून, दिवसेंदिवस बाधित आणि मृतांची संख्या वाढत आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत नवीन बाधित रुग्णांपेक्षा बरे होवू घरी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मागील आठवड्यात एकाच दिवशी 196 तर, बुधवारी 168 व्यक्तींना घरी सोडले. त्यामुळे आतापर्यंतच्या बाधितांपैकी 51 टक्के रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे शहरात आतापर्यंत करोनामुळे 178 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर, दाखल रुग्णांपैकी 116 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामध्ये 31 जण व्हेंटिलेटरवर तर 49 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.
पुण्यात रुग्ण दुप्पटीचे प्रमाण कमी
पुणे मनपा हद्दीत करोना रुग्ण वाढीचा दुप्पटीचा वेग आता 13 दिवसांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे मागील आठवड्यात करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता 9 हजार 600 बेडची तयारी करण्यात येत होती. परंतु, सध्याचे आकडेवारीनुसार करोना रुग्णांची संख्या 5 हजारपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले. पुण्यातील वेगवेगळ्या झोपडपट्टीत 25 हजार अन्नधान्य कीट वाटपाचे काम करण्यात येत असून, 17 मे पर्यंत ते पूर्ण होईल. नवीन प्रोटॉकॉलनुसार निगेटिव्ह असलेले रुग्ण लवकर घरी सोडण्यात येत आहे. डॉक्टरांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी महापलिकेकडून कॉन्ट्रॅक्ट पद्दतीवर डॉक्टर भरती केली जात आहे.