पुढील आठ दिवसांत 10 लॅब कार्यान्वित होणार : आरोग्यमंत्री टोपे
एनआयव्ही आणि आरोग्य यंत्रणेच्या कामाचे कौतुक
पुणे – करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता येत्या 12 तासांत आणखी तीन ठिकाणी नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा (लॅब) सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये पुण्यातील बै. जी. शासकीय महाविद्यालय, मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयात आणखी एक प्रयोगशाळेचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संशोधन (एनआयव्ही) मध्ये दररोज चारशे नमुने तपासणी होतात. त्यासाठी “एनआयव्ही’तील डॉक्टर दिवस-रात्र काम करत असल्याचे टोपे यांनी सांगत त्यांनी आरोग्य विभागाचे कौतुक केले. राज्यात करोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, सध्या आपण दुसऱ्या टप्प्यात आहोत. तिसऱ्या टप्प्यात जाऊ नये, यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, व्यक्तीला करोना विषाणूची बाधा झाली की नाही याची तपासणी करण्यासाठी सध्या चार ठिकाणी प्रयोगशाळा आहेत. मात्र, येणाऱ्या नमुन्यांची संख्या लक्षात घेता, आणखी लॅब सुरू करण्यात येत आहे.
त्यामध्ये मुंबई येथील केईएम रुग्णालयात बुधवारी लॅब सुरू करण्यात आली आहे. कस्तुरबा रुग्णालयात आणखी एक लॅब सुरू केली असून, दररोज 250 नमुने तपासता येणार आहे. तर पुण्यातील बै. जी. शासकीय रुग्णालय येथे गुरूवारी (दि. 19) सकाळपासून लॅब सुरू होणार असून, त्याठिकाणी 200 नमुने तपासता येणार आहेत. त्याचबरोबर मुंबई येथील जे. जे. रुग्णालय आणि हापकीन येथे दोन असे एकूण तीन लॅब सुरू करण्यात येणार आहे.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालय याठिकाणी लॅब सुरू करण्यात येणार असून, औरंगाबाद, धुळे, मिरज आणि सोलापूर येथे येत्या दहा दिवसांत या लॅब सुरू होतील. लॅब सुरू करण्याअधी “आयसीएमआर’ आणि “एनआयव्ही’ यांच्या मान्यतेने ह्या लॅब सुरू होणार असून, त्यासाठी आवश्यक साधनसामग्री आणि किट्स देण्यात येणार आहे, असेही टोपे म्हणाले.
खासगी रुग्णालयात तपासणीस परवानगी
करोना विषाणूची लागण झाली, की नाही याची तपासणी खासगी रुग्णालयातही करता येणार असल्याबाबतचा निर्णय बुधवारीच देण्यात आला आहे. त्यानुसार खासगी रुग्णालयातही तपासणी होणार असून, ही तपासणी संबंधित व्यक्तीला स्वत:च्या खर्चाने करावी लागणार आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले.