आळंदी – श्रीक्षेत्र अलंकापुरी नगरीतील संजीवन समाधीचे दर्शन मंगळवारी रात्री बारा वाजल्यापासून बंद करण्यात आल्याने आज (बुधवारी) नियमित माउलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येथील महाद्वारात असणाऱ्या श्री गुरू हैबतराव बाबांच्या पायरीच्या दर्शनावरच समाधान मानावे लागले.
गेली 700 वर्षांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार माउलींचा संजीवन समाधी सोहळा हा गुरू हैबतराव बाबांच्या पायरी पुजनाने सुरू होत असतो. मात्र, आज देशावर करोनाचे महाभयंकर संकट उद्भवल्याने इतिहासात प्रथमच मंदिर बंद ठेवण्याची वेळ आली आहे. आज महाद्वार बंद असल्याने गुरु हैबत बाबांची पहिली पायरी यांच्या महाद्वारा बाहेरील असणाऱ्या पादुकांचे दर्शन घेऊन भाविक माघारी फिरत होते.
करोना व्हायरसमुळे मंदिर बंद असल्याने देवस्थानच्या निर्णयास प्रतिसाद देत अनेकांनी देवस्थानला सहकार्य केले; मात्र येथील जनजीवनावर विपरीत असा परिणाम होऊन येथील पार्किंग, बसस्थानक व इतर सार्वजनिक ठिकाणे तसेच बाजारपेठ गल्लीबोळातील रस्ते ओस पडले असून अलंकापुरीत स्वयंघोषित अशी संचारबंदी आहे की काय? असे चित्र आज पहाटेपासूनच पाहावयास मिळत होते.
अनेक व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापली दुकाने बंद ठेवली होती. दरम्यान 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत माऊली मंदिरात होणारे नित्याचे धार्मिक कार्यक्रम हे नियमित सुरू राहणार असल्याचे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त विश्वास ढगे पाटील यांनी सांगितले.