बफेलो (अमेरिका) – तुर्की आणि सीरियामध्ये विनाशकारी भूकंपाचा धक्का बसलेला असताना दूर अमेरिकेत देखील कमी क्षमतेच्या भूकंपाचा धक्का जाणवला आहे. न्यूयॉर्कच्या पश्चिमेच्या भागाला हा भूकंपाचा धक्का बसला. यामुळे घरांना हादरे बसले. मात्र कोणत्याही जीवित अथवा वित्त हानीचे वृत्त नाही.
पहाटे 6.15 वाजता वेस्ट सेनेकाचे उपनगर असलेल्या बफेलो भागाला बसलेल्या या भूकंपाची तीव्रता 3.8 इतकी होती, असे युएस जिऑलॉजिकल सर्व्हेने म्हटले आहे. या भागामध्ये भूकंप होण्याचा इतिहास नाही. गेल्या 40 वर्षात येथे कोणत्याही मोठ्या भूकंपाच्या धक्क्याची नोंद झालेली नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बफेलो येथे झालेल्या भूकंपाचा कालावधी काही सेकंद होता. यामुळे सतर्क झालेल्या लोकांनी खिडक्यामधून बाहेरील परिस्थितीचा अंदाज घेतला आणि नंतर सोशल मीडियावर भूकंपाच्या बातम्यांबाबत सर्च सुरू केला होता.
कॅनडामध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता 4.2 इतकी होती. ओन्टारिओच्या दक्षिणेकडील भागाला हा धक्का जाणवला. मात्र यामुळेही कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.