नवी दिल्ली – भारतीय जनता पार्टीने (BJP) उत्तर प्रदेशच्या रायबरेली मतदार संघातून ( Raebareli constituency) दिनेश प्रताप सिंह (Dinesh Pratap Singh) यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांनी पूर्वीही येथून कॉंग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा व ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या विरोधात निवडणूक लढवली आहे. दरम्यान, भाजपने कैसरगंज मतदार संघातून करण भूषण सिंह यांना उमेदवारी दिली आहे. भाजप या जागेवरून पुन्हा कुस्ती महासंघाचे वादग्रस्त अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांनाच उमेदवारी देणार का याबाबत बराच सस्पेन्स होता. अखेर त्यावरील पडदा उघडला गेला असून आता करण भूषण येथून निवडणूक लढवतील.
२०१९ मध्ये प्रचाराच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनेश प्रताप सिंह यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामुळे पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते असलेले दिनेश प्रताप यांचे भाजपमधील वजन वाढत गेले. आताही राज्यसभेच्या निवडणुकीत संजय सेठ यांच्या विजयात त्यांची महत्वाची भूमिका होती असे म्हटले जाते. आता उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान, अमित शहा आणि भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे आभार मानले असून रायबरेलीत आपण कमळ फुलवू आणि त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू असा विश्वास व्यक्त केला आहे.
रायबरेलीचे दिनेश प्रताप सिंग कोण आहेत?
2018 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले दिनेश प्रताप सिंग हे यापूर्वीही विधान परिषदेचे सदस्य राहिले आहेत. प्रथम ते 2010 ते 2016 पर्यंत, नंतर 2016 ते 2022 पर्यंत ते विधान परिषदेचे सदस्य राहिले आणि त्यानंतर 2022 मध्ये ते तिसऱ्यांदा विजयी झाले. दिनेश सिंग सध्या यूपीच्या योगी सरकारमध्ये राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) आहेत. 2018 मध्ये काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या दिनेश प्रताप सिंह यांना पक्षाने रायबरेलीमधून तिकीट दिले होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना कडवी झुंज दिली, पण त्यांना विजय मिळवता आला नाही. सोनिया गांधी यांना 55.80 टक्के मते मिळाली, तर दिनेश सिंह यांना 38.36 टक्के मते मिळाली.
रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला –
उत्तर प्रदेशातील अमेठी आणि रायबरेली या जागा गांधी घराण्याचा गड मानल्या जातात. मात्र, गेल्या निवडणुकीत भाजपच्या स्मृती इराणी यांनी अमेठीत राहुल गांधी यांचा पराभव केला होता, मात्र रायबरेलीमध्ये काँग्रेसचा विजय झाला होता. 2004 ते 2024 या काळात सोनिया गांधी रायबरेलीच्या खासदार होत्या. 2004 नंतर, 2006 पोटनिवडणुकीत त्यानंतर 2009, 2014 आणि 2019 मध्ये सोनिया गांधींना मोठा विजय मिळाला. मात्र, यंदा सोनिया गांधींनी रायबरेलीतून निवडणूक न लढवण्याचा आणि राज्यसभेवर जाण्याचा निर्णय घेतला. सध्या त्या राजस्थानमधून काँग्रेसच्या राज्यसभा खासदार आहेत. काँग्रेस रायबरेली आणि अमेठीच्या जागांसाठी लवकरच उमेदवार जाहीर करणार आहे.