संयुक्त राष्ट्र – पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राच्या पूर्ण सदस्यत्वाचा दर्जा मिळावा यांसाठी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आलेला प्रस्ताव अमेरिकेने नकाराधिकार वापरून फेटाळला आहे. अमेरिकेच्या या कृतीचे इस्रायलने कौतुक केले आहे, मात्र पॅलेस्टाईनने यावर टीका केली आहे. अमेरिकेची ही कृती अयोग्य, अनैतिक आणि अन्यायकारक आहे, असे पॅलेस्टाईनने म्हटले आहे.
पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राचे सदस्यत्व मिळावे या मागणीचा हा प्रस्ताव सयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये मांडण्यात आला होता आणि या प्रस्तावावर काल मतदान घेण्यात आले. सुरक्षा परिषदेमध्ये हा ठराव मंजूर झाला असता तर संयुक्त राष्ट्राच्या महासभेमध्ये यावर विचार करण्याची शिफारस केली जाऊ शकली असती.
मतदानाच्यावेळी प्रस्तावाच्या बाजूने १२ मते पडली. स्वीत्झर्लंड आणि ब्रिटन मतदानाच्यावेळी अलिप्त राहिले आणि अमेरिकेने नकाराधिकार वापरून प्रस्ताव फेटाळून लावला. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी सुरक्षा परिषदेतील किमान ९ सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान करणे आवश्यक असते. तर कायम सदस्य असलेल्या चीन, फ्रान्स, ब्रिटन, रशिया आणि अमेरिका या ५ देशांपैकी कोणीही नकाराधिकाराचा वापर करायना नको.
बिगर सदस्य निरीक्षक…
पॅलेस्टाईनने २०११ पासून संयुक्तराष्ट्राचे पूर्ण सदस्यत्व म्हणून मान्यता मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. पॅलेस्टाईन सध्या संयुक्त राष्ट्रामध्ये बिगर सदस्यत्व निरीक्षक आहे. नोव्हेंबर २०१२ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेने पॅलेस्टाईनला हा दर्जा दिला आहे. याअंतर्गत पॅलेस्टाईनला संयुक्त राष्ट्राच्या कामात सहभागी होता येते. मात्र मतदान करता येत नाही.