ओस्लो (नॉर्वे)- नॉर्वेने युक्रेनला 7.3 अब्ज डॉलरची मदत देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही मदत पुढील 5 वर्षांच्या कालावधीमध्ये दिली जाणार आहे. याशिवाय युद्धाच्या आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या अन्य देशांनाही मदत दिली जाईल, असे नॉर्वेने म्हटले आहे. नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गहर स्टोर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
युक्रेनला दरवर्षी 1.5 अब्ज क्रोनर इतकी मदत दिली जाईल. ही मदत पुढील 5 वर्षांपर्यंत दिली जाईल, असे त्यांनी विरोधकांसमोर मांडलेल्या मदतीच्या सविस्तर योजनेमध्ये म्हटले आहे. या मदतीमध्ये मानवतावादी आणि लष्करी मदतीचाही समावेश असणार आहे. या वर्षासाठी या दोन्ही कारणांसाठी समसमान मदत दिली जाणार आहे.
मदतीच्या अंतिम पॅकेजमधील आकडा संसदेकडून निश्चित केला जाणार आहे. संसदेमध्ये सरकारचे बहुमत नसल्यामुळे पॅकेजमधील आकडा किती असेल हे विरोधकांच्या मर्जीवर अवलंबून असणार आहे.
युक्रेन रशिया युद्धामुळे नॉर्वेला मिळणाऱ्या गॅसमध्ये मोठी कपात झाली आहे. सरकारने गेल्या वर्षी विकास मदतनिधीमध्ये मोठी कपात केली आहे. याबद्दल नॉर्वेच्या सरकारवर देशभरातून मोठी टीका झाली होती.