वॉशिंग्टन – इराणने इस्रायलवर केलेल्या ड्रोन हल्ल्यानंतर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री ऍन्टनी ब्लिंकेन यांनी जॉर्डन, सौदी अरेबिया, तुर्कीये आणि इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला आहे. तर अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी सौदी आणि इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांशी संपर्क साधून चर्चा केली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर मध्यपूर्वेत तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन यावेळी चर्चा करण्यात आली. (Iran drone attack on Israel: US talks with Jordan, Turkey, Saudi Arabia)
संभाव्य तणाव लक्षात घेऊन अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी देखील जी-७ देशांच्या प्रतिनिधींशी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला. याशिवाय जॉर्डनचे राजे अब्दुल्ला आणि इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू यांच्याशी स्वतंत्रपणे फोनवरून संवाद साधला.
या सर्व संवादाच्यावेळी अमेरिकेच्या नेतृत्वाने प्रादेशिक तणाव वाढू न देम्याच्या गरजेवर विशेष भर दिला. इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये स्थायी शांतता आणि सुरक्षा रहण्यासाठी गाझामधील संघर्ष संपुष्टात यायला हवा. त्यासाठी मुत्सदेगिरीवर भर देम्यात यावा, याचाही आग्रह यावेळी धरण्यात आला.
हा संघर्ष वाढू न देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल ब्लिंकेन यांनी तुर्कीयेच्या परराष्ट्र मंत्र्यांचे आभारही मानले. तसेच गाझामधील मदत साहित्याच्या वितरणात केलेल्या सहकार्याबद्दल इजिप्तच्या परराष्ट्र मंत्र्यांनाही धन्यवाद दिले. बायडेन यांनी या अनुषंगाने अमेरिकेच्या संसदेच्या सिनेट सदस्यांशीही संवाद साधला आहे.
मध्यपूर्वेतील तणाव नियंत्रणात राखला जायला हवा, यासाठी तात्काळ प्रयत्न करण्याच्या गरजेवर संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस ऍन्टनिओ गुटेरेस यांनी देखील भर दिला आहे. मध्यपूर्वेतील सर्व संबंधितांशी संपर्क साधून संघर्ष टाळावा, असे आवाहन त्यांनी सुरक्षा परिषदेच्या तातडीच्या बैठकीत केले आहे.