IPL 2024 ( CSK Playoffs Qualification Scenario ) : चेन्नई सुपर किंग्जला पंजाब किंग्जविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. त्याचवेळी या पराभवानंतर ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जचा प्लेऑफमधील मार्ग कठीण होताना दिसत आहे. मात्र, असे असतानाही चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा प्रबळ दावेदार आहे. वास्तविक, पंजाब किंग्जविरुद्धच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचे 10 सामन्यांत 10 गुण झाले आहेत. हा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आहे.
आता चेन्नई सुपर किंग्जचे समीकरण काय असेल?
आता चेन्नई सुपर किंग्जचे 4 सामने बाकी आहेत. गेल्या वर्षांची आकडेवारी (IPL 2023 मध्ये CSK ने 8 विजयासह प्लेआॅफमध्ये प्रवेश केला होता) पाहिली तर रुतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जला किमान 3 सामने जिंकावे लागतील. जर हा संघ 3 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर 14 सामन्यांनंतर त्याचे 16 गुण होतील. 16 गुणांसह चेन्नई सुपर किंग्जच्या पात्रतेची शक्यता लक्षणीय वाढेल. आता पंजाब किंग्जशिवाय चेन्नई सुपर किंग्जला गुजरात टायटन्स, राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यासोबत खेळायचे आहे.
राजस्थान रॉयल्सचे अव्वल स्थान कायम …
त्याचवेळी संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने अव्वल स्थानावर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. राजस्थान रॉयल्स 10 सामन्यांत 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. राजस्थान रॉयल्स प्लेऑफमध्ये खेळणार हे जवळपास निश्चित झाले आहे. यानंतर कोलकाता नाईट रायडर्स 9 सामन्यांत 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. तर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्सचेही 12 गुण आहेत. चेन्नई सुपर किंग्जशिवाय सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सचे प्रत्येकी 10 गुण आहेत. दरम्यान, पॉइंट टेबलमधील टॉप-4 संघ प्लेऑफसाठी पात्र ठरतील.