Brijbhushan Sharan Singh | Karan Bhushan | Kaiserganj – महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेले भाजपाचे बाहुबली खासदार ब्रिजभूषण शरण सिंह हे निवडणूक लढण्याआधीच चितपट झाले आहेत. त्यांच्या वादग्रस्त पार्श्वभूमीमुळे भाजपाने त्यांना उमेदवारी दिलेली नसून त्यांच्य ऐवजी त्यांचा धाकटा मुलगा करणसिंहला ही उमेदवारी देण्यात आली आहे.
तत्पूर्वी, तिकिटाचे आश्वासन मिळाल्यानंतर करण भूषण यांनी वडील आणि विद्यमान खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांचे आशीर्वाद घेतले. आशीर्वाद घेताना ब्रिज भूषण यांनी करण भूषण सिंह यांना उमेदवार बनवण्याबाबत त्यांच्या समर्थकांना सांगितले आणि त्यांना परिसरात प्रचार करण्यास सांगितले. करण भूषण उद्या शुक्रवारी सकाळी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
कैसरगंज जागेवर ब्रिजभूषण यांची मजबूत पकड आहे. अशा स्थितीत त्यांच्या कुटुंबातील एकाला भाजप तिकीट देईल, अशी अटकळ आधीच वर्तवली जात होती. ब्रिजभूषण यांना स्वतः निवडणूक लढवायची होती मात्र महिला कुस्तीपटूंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांची उमेदवारी धोक्यात आली होती.
अलीकडेच खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांनी कैसरगंजचे नाव केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे, असे विधान केले होते. तिकीटाचा प्रश्न आहे, आमच्या भागातील कार्यकर्ते सक्रिय आहेत, पक्ष गप्प आहे. लग्नाची मिरवणूक सजली आहे, पण वर गायब आहे.
पण माझा दावा आहे की भाजप हायकमांडने एक तास अगोदर ही घोषणा केली तर आम्ही मोठ्या विजयासह दिल्लीत पोहोचू. येथील कार्यकर्त्यांच्या भावनांची राज्य आणि केंद्रातील नेतृत्व निश्चितपणे दखल घेईल, असे ते म्हणाले होते. पण भाजपने त्यांना नाही तर त्यांच्या मुलाला तिकीट दिले.
कैसरगंज जागेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मे आहे. या जागेवर पाचव्या टप्प्यात मतदान होणार आहे. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील मोहनलालगंज, लखनौ, रायबरेली, अमेठी, जालौन, झाशी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशांबी, बाराबंकी, फैजाबाद, कैसरगंज आणि गोंडा येथे मतदान होणार आहे.