कोटा – कोटा शहरात नीट प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.
कोटा येथील अतिरिक्त पोलीस अधिक्षक उमा शर्मा यांनी या घटनेची सविस्तर माहिती दिली. या माहितीनुसार सदर घटना शनिवारी (१० फेब्रुवारी) घडली. पीडित मुलगी ही हरियाणातील गुरुग्राम येथील रहिवासी आहे.
गेल्या वर्षभरापासून ती कोटा शहरात डॉक्टर होण्याचे स्वप्न उराशी बाळगून नीट परीक्षेची तयारी करत होती. या प्रकरणातील एक आरोपी हा मुळचा उत्तर प्रदेशाचा आहे. या आरोपीची आणि पीडित मुलीची समाजमाध्यमावर ओळख झाली.
त्यानंतर शनिवारी आरोपीने मुलीला त्याच्या फ्लॅटवर बोलावले. त्यानंतर आरोपीने त्याच्या आणखी तीन मित्रांनाही बोलावले. त्यानंतर चौघांनी मिळून पीडितेवर अत्याचार केला, असे शर्मा यांनी सांगितले.
सुरुवातीला पीडित मुलगी तक्रार देण्यासाठी घाबरत होती. मात्र हा प्रकार तिने मैत्रिणींना सांगितल्यानंतर तिच्या मैत्रिणींनी पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर पुढे येत या मुलीने पोलिसांत धाव घेतली.
मंगळवारी (१३ फेब्रुवारी) पीडित मुलीने पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणातील आरोपींचे वय १८ ते २० वर्षे आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मंगळवारीच सर्व आरोपींना अटक केली.