नवी दिल्ली – मणिपूरच्या इम्फाळ पूर्व जिल्ह्यातील विशेष दलाच्या चिंगारेल कॅम्पमधून शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा लुटल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याबद्दल भारतीय राखीव बटालियनच्या सात जवानांना निलंबित करण्यात आले आहे.
५व्या भारतीय राखीव बटालियनच्या कमांडंटने गुरुवारी जारी केलेल्या आदेशानुसार या जवानांना पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुख्यालय सोडू नये, असे सांगण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी या छावणीतून शस्त्रे आणि दारूगोळा लुटण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी सात जवानांना “कर्तव्यांमध्ये गंभीर निष्काळजीपणा आणि कसूर केल्याबद्दल” निलंबित करण्यात आले आहे.
शस्त्रास्त्र लुटीच्या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.या कॅम्पमधून चार इन्सास रायफल, एक एके रायफल, एसएलआरची दोन मॅगझिन आणि ९ एमएम दारूगोळ्याचे १६ छोटे बॉक्सही लुटण्यात आले आहेत.१३ फेब्रुवारी रोजी एका जमावाने चिंगारेल येथील आयआरबीच्या छावणीत घुसून शस्त्रे व दारूगोळा घेऊन पळ काढला आहे.