पवारांचा गड आला पण, सिंह गेला

सुळेंचा विजय मात्र, पार्थ पवारांच्या पराभवाने बारामतीत विजयोत्सवावर पाणी

बारामती – बारामती आणि राजकीय विजयाचे मोठे अतुट नाते आहे. आजपर्यंत हे नाते अबाधित होते. निवडणुकीआधीच गुलाल उधळण्याची, फटाक्‍यांच्या आताषबाजीची तयारी केली जात असे. राष्ट्रवादी कॉंग्रेस भवनपासून शहरातून विजयी मिरवणुकीचा जल्लोष बारामतीकरांनी नेहमीच अनुभवला आहे. पेढे भरवुन विजयाचे जोरदार स्वागत केले जायचे. मात्र, सुप्रिया सुळे विजयी झाल्या तरी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा मावळ लोकसभा मतदारसंघातून पराभव झाल्याने “गड आला, पण सिंह गेला’ असेच काहीसे चित्र बारामतीत दिसुन आले.

आज सकाळी पुण्यात मतदान मोजणी सुुरु झाल्यानंतर मावळमध्ये पार्थ पवार सुरवातीपासून पिछाडीवर होते. त्यामुळे बारामतीकर लक्ष देवुन निकाल ऐकत होते. याच वेळी मतमोजणी सुरु झाल्यावर एक तासांनी दुसजया फेरीदरम्यान सुप्रिया सुळे सुमारे 8 हजार मतांनी पिछाडीवर असल्याची बातमी “फ्लॅश’ झाली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या काळजाचा ठोका चुकता चुकता राहिला. मात्र, अवघ्या दहा मिनिटात चित्र बदलले. त्यांनतर खासदार सुळे यांच्या मताधिक्‍क्‍याचा आलेख विजय घोषित होईपर्यंत वाढताच होता. शेवटच्या फेरीनंतर सुळे 1 लाख 54 हजार 159 च्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाल्याची बातमी बारामतीत धडकली. त्यापाठोपाठ पार्थ यांच्या मावळच्या मोठ्या पराभवाची बातमी देखील “फ्लॅश’ झाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते शांत बसुन होते.

बारामती लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर येथील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी त्यांचा मुक्‍काम मावळमध्ये हलविला. पार्थ यांच्या विजयासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्या प्रयत्नांना यश आले नाही. निकालानंतर विजयोत्सव साजरा करण्यासाठी शहर तालुक्‍यातील कार्यकर्ते एकत्र येतात. आज देखील खासदार सुळे यांच्या विजयोत्सवाची जोरदार तयारी कार्यकर्त्यांनी केली होती.विजयी जल्लोषासाठी फटाके, गुलाल आणुन ठेवला. मात्र, पार्थ यांच्या पराभवाच्या बातमीने विजयोत्सवाच्या तयारीवर पाणी पडले. लोकसभेच्या निकालाचे तीव्र पडसाद बारामतीत उमटले. चौकाचौकात असणाऱ्या जल्लोषाची जागा “पिनड्रॉप सायलेन्स’ने घेतल्याचे चित्र होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)