Lok Sabha Election 2024| देशभरात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी या आठ मतदारसंघात मतदान होत आहे. या ठिकाणी आता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली असून नागरिकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. मात्र मतदानाला सुरुवात होताच काही ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला आहे.
अमरावती, अकोला आणि वर्ध्यात ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचं पाहायला मिळाले. ईव्हीएममध्ये बिघाड होताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. अमरावती शहरातील रुक्मिणीनगर येथील शाळा क्रमांक १९ मधील खोली क्रमांक ५ मध्ये ईव्हीएम बंद पडले. जवळपास १५ मिनिटे वोटिंग मशीन बंद पडलं होतं. त्यामुळे मतदारांचा चांगलाच खोळंबा झाला होता. अखेर ईव्हीएममधील तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला. दुसरीकडे वर्ध्यात देखील ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला. मात्र काही वेळानंतर पुन्हा सुरळीत मतदान प्रक्रिया सुरू झाली.
अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातही ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. उमरा गावातील बुथ क्रमांक ३३३ मधील वोटिंग मशीन अचानक बंद पडलं. त्यामुळे साडेसात वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झालेली नव्हती. वोटिंग मशीन बंद पडताच निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. मतदान थांबल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या.
हेही वाचा:
Lok Sabha Election 2024 । ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज यांनी केले ‘मतदान’