राष्ट्रवादीचा गड राखत उदयनराजेंची कॉलर टाईट!

संग्रहित छायाचित्र

श्रीकांत कात्रे
सातारा मतदारसंघात अपेक्षेप्रमाणे उदयनराजे भोसले यांनी विजयाची हॅट्रिक मिळवली. मात्र, शिवसेनेच्या नरेंद्र पाटील यांनी त्यांच्यासमोर चांगले आव्हान उभे केल्याने उदयनराजे समर्थकांच्या सर्वाधिक मताधिक्‍याच्या स्वप्नावर पाणी पडले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गड राखण्यात यश आले. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेने आपली पाळेमुळे आणखी बळकट केली आहेत. उदयनराजेंचे मताधिक्‍य कमी झाल्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादी कॉग्रेसची कसोटी लागणार असल्याचेही स्पष्ट झाले.

मोदी यांच्या लाटेतही तीन लाख 67 हजाराचे मोठे मताधिक्‍य मिळविणाऱ्या उदयनराजे भोसले यांना यावेळी कमी मतांच्या फरकाने विजय मिळवता आला, ही बाब त्यांना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही नामुष्कीची आहे. केवळ स्टाइल आणि निवडणुकीपुरती आक्रमक वक्तव्ये करून राजकारण चालणार नाही, असा इशाराच लोकांनी दिला आहे. लोकांची कामे, मतदारसंघाचा विकास याबाबत एक गांभीर्य असणेही तितकेच महत्त्वाचे असते. लोकांना सक्षम पर्याय मिळाला की आव्हान उभे राहतेच. लोकसभेचा मतदारसंघ म्हणजे केवळ सातारा पालिकेच क्षेत्रफळ नव्हे तर जिल्ह्याचा बहुतांश भाग असतो, हे लोकांनी दाखवून दिले आहे. युतीच्या जागावाटपात साताऱ्याची जागा भाजपकडे असती तर या मताधिक्‍क्‍यात आणखी बदल दिसू शकला असता. शिवसेनेकडून नरेंद्र पाटील यांनी दिलेली टक्कर म्हणजे कुठेही कुणाची कायमस्वरूपी मक्तेदारी टिकू शकत नाही, असे संकेत दिले आहेत. लोकांमध्ये परिवर्तन घडविताना स्वतःमध्येही काही बदल करावे लागतात, अशी अपेक्षाही निकालाने व्यक्त केली आहे.

कऱ्हाड, पाटण तालुक्‍यांमधून उदयनराजे यांना थेट लोकांमधून होणारा विरोध लक्षात घेण्यासारखा होता. निवडणुकीपुरतेच तालुक्‍यात संपर्क होत असल्याने लोकांमध्ये नाराजी होती. स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी काहीही सांगितले तरी लोकांची मते निश्‍चित झालेली होती. तीच मतदानात परिवर्तित झाल्याचेही स्पष्ट झाले आहे. खासदार भोसले यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच उमेदवारी हवी होती. कारण मतदारसंघातील वाड्यावस्त्यांपर्यंत या पक्षाचे नेटवर्क आहे. त्या नेटवर्कचा फायदा उमेदवाराला मिळतो, हे गणित त्यामागे होते.

भाजपने बूथवाइज संघटनाचे प्रयत्न केले तरीही ते विजयापर्यंत पोहचू शकत नव्हते. शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम असती तरीही नरेंद्र पाटील यांना दिलासा मिळाला असता. भाजपच्या बाजूने केलेल्या प्रयत्नांमुळेच पाटील यांना काही प्रमाणात आव्हान देता आले.राष्ट्रवादी कॉंग्रेसमधूनच उदयनराजेंच्या उमेदवारीला विरोध होता.अखेर पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिलजमाई करीत उदयनराजेंना सेफ केले. पवार यांच्या आग्रहामुळे सर्वच आमदार आपला विरोध विसरून प्रचारकाळात उदयनराजेंसमवेत दिसले. त्यामुळेच सातारा, वाई, कऱ्हाड उत्तर व कोरेगाव या चार विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसला आघाडी मिळाली.

पाटण व कऱ्हाड दक्षिण या दोन मतदारसंघात पाटील यांनी आघाडी घेतली. शिवसेनेचे शंभूराज देसाई व विरोधातील उमेदवार नरेंद्र पाटील यांचा तालुका असल्याने पाटणमध्ये आघाडी अपेक्षित होती. सातारा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघांच्या आगामी राजकारणाची समीकरणे या निकालाने किती बदलणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
विजय मिळविला तरीही आता उदयनराजे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला आत्मपरीक्षण करणे भाग पडणार आहे. आतापर्यंत पर्याय नसल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसला तुलनेत निवडणूक सोपी जायची. आता लोकसभेप्रमाणेच विधानसभेसाठीही सक्षम पर्याय देण्याचे प्रयत्न युतीने केलेल आहेतच. संघटनात्मक बांधणी व मतदारसंघातील भाजप नेत्यांचा वाढता वावर यामुळे विधानसभेसाठीही भाजप- शिवसेना जीवाचे रान करणार, यात शंका नाही. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघ टिकविला. आता राष्ट्रवादी कॉंग्रेसपुढे विधानसभेचे गड टिकविण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे. या निकालाने जिल्ह्याच्या राजकारणाला तीच दिशा दिली आहे. पक्षाच्या आमदारांनी उघडपणे उमेदवार बदलाची मागणी पक्षाकडे नोंदवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)