पुणे – बारामती, शिरूर, मावळ आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुण्यात येत्या २९ एप्रिल रोजी जाहीर सभा घेणार आहे. या शिवाय, पंतप्रधान मोदी यांचा पुण्यात एक रोड शो आयोजित करण्यात आला आहे.
मोदी यांच्या “रोड शो’साठी महायुतीकडून संयुक्त तयारी करण्यात येत असून महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे नेते या सभेला उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत तूर्त निश्चित नसल्याचे मनसेकडून सांगण्यात येत आहे. महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार गुरुवारी (दि. २५) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
त्या निमित्ताने महायुतीकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. यात सकाळी ९ वाजता कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापर्यंत पदयात्रा काढली जाणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा नदीपात्रालगतच्या मैदानात होणार आहे.
मनसेही घेणार मेळावा
यावेळी महायुतीच्या प्रचाराचा झेंडा हातात घेतलेल्या मनसेकडून पुण्यात दि. २७ एप्रिल रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या वेळी पक्षाध्यक्ष राज ठाकरे उपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा हा मेळावा असणार असल्याने मनसेकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ठाकरे यांच्या उपस्थितीबाबत बोलण्यास नकार दिला जात आहे.