तळेगाव स्टेशन – जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या वतीने अध्यक्षा संध्या थोरात यांनी सोमाटणे जवळील विठ्ठलवाडीची शाळा दत्तक घेतली आहे. या शाळेत विविध सोयी-सुविधा देऊन ही शाळा “हॅप्पी स्कूल’ केली आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना असुविधांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे विद्यार्थी संख्या रोडावत चालली आहे. पैशांअभावी कष्टकरी समाजातील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेत येतात. जिल्हा परिषदेच्या सोमाटणे जवळील विठ्ठलवाडी शाळेत इयत्ता पहिली ते चौथी पर्यंतची मुले शिक्षण घेतात. मोल मजुरी करणाऱ्या पालकांची ही मुले आहेत. या मुलांना वह्या, कंपास बॉक्स, दप्तरे घेणेही शक्य होत नाही.
इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी ही शाळा “हॅप्पी स्कूल’ केली आहे. विद्यार्थ्यांसाठी वॉटर प्युरिफायर, वाचनालयासाठी लाकडी कपाट, मुलांना बसायला बेंचेस, वह्या, कंपास बॉक्स, स्कूल बॅग्ज, खेळाचे साहित्य, ई लर्निंग कीट इत्यादी साहित्य भेट दिले आहे. यासाठी एकूण 82 हजार रुपयांचा खर्च आला. या सुविधांमुळे मुलांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरील आनंद खूप काही सांगून गेला.
या साहित्यासाठी मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, सचिन मुऱ्हे, विनायक आगळे, सारिका बाळासो भेगडे, अर्चना देशमुख, डॉ. दीपाली झंवर, मंगल पवार, ममता मराठे, मंजुश्री जुडे, डॉ. लीना कवितके, इंद्राणी दास, अभिषेक तिवारी, बसनगोंड कडोली यांनी मदत केली.
सर्व सुविधा दिल्यावर शाळेच्या भिंतीवर “हॅप्पी स्कूल’चा फलक लावण्यात आला आहे. यावेळी इनर व्हील क्लब तळेगाव दाभाडेच्या अध्यक्षा संध्या थोरात, सचिव निशा पवार, एडिटर आरती भोसले यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांच्या उपस्थितीत फलकाचे अनावरण केले.