नवी दिल्ली – युवराजसिंग व महंमद कैफ यांच्यात सोशल मीडियावरील चर्चा चांगलीच रंगली. त्यात कैफच्या प्रत्येक प्रश्नावर तशाच पद्धतीने युवराजने टोलेबाजी केली. क्रिकेट सामन्यांचे समालोचन करण्याची इच्छा आहे का, या प्रश्नावर अजिबात नाही असे उत्तर युवराजने दिले. त्याचबरोबर समालोचन कक्षात काही लोकांबरोबर वायफळ चर्चा करणे तसेच त्यांच्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन पाहणे यासाठी लागणारा संयम माझ्याकडे नाही, असे सांगत युवराजने अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणाऱ्या समालोचकांचेही कान उपटले.
गेल्या काही दिवसांपासून युवराजसिंगने आपल्या कारकिर्दीतील अनेक चढ-उतारांवर भाष्य केले आहे. युवराजला यावरूनच कैफने इन्स्टाग्रामवर बोलते केले. तू काही सोकॉल्ड जाणकार लोकांबरोबर समालोचन कक्षात बसू शकतोस पण माझ्याकडे तुझ्यासारखा संयम नाही. विश्वकरंडक किंवा एखाद्या मोठ्या स्पर्धेपुरते समालोचन करायला मला निश्चितच आवडेल. मात्र, पूर्णवेळ समालोचक म्हणून काम करणे मला शक्य नाही. काही व्यक्ती आपले कर्तृत्व किंवा एकूणच आपले क्रिकेटबाबतचे ज्ञान यांत अनभिज्ञ असूनही खूप काही कळत असल्याचा आव आणतात तेव्हा त्यांचे समालोचन ऐकून खूप चिडचिड होते. त्यामुळे मला अशा लोकांचा सहवास नकोसा होतो, असेही युवराजने स्पष्ट केले.
करोनाचा धोका वाढत असताना जगभरातील क्रिकेटसह अनेक स्पर्धा रद्द झाल्या आहेत. त्यात संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. त्यामुळे सध्या अनेक खेळाडू घरीच आहेत. या काळात मिळत असलेल्या मोकळ्या वेळात हे खेळाडू सोशल मीडियावर सक्रिय आहेत. कैफनेही ही संधी साधत युवराजशी संवाद साधला. कैफने 2018 साली तर युवराजने 2019 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानंतर कैफने समालोचनाचा पर्याय निवडला तर युवराज अन्य देशांत होणाऱ्या आयपीएलच्या धर्तीवरच्या टी-20 स्पर्धांमध्ये सहभागी होतो, पण भारतीय संघात साधारण एकाच काळात पदार्पण केलेले हे दोन्ही खेळाडू एकमेकांचे आजही चांगले मित्र आहेत. त्यामुळेच कैफने या संवादादरम्यान युवराजला अडचणीत आणणारे अनेक प्रश्न विचारले. मात्र, युवराजनेही त्याच्या नेहमीच्या स्वभावानुसार त्यावर तुफान टोलेबाजी केली. या दोघांतील चर्चा नेटकरी मंडळींच्या कुतुहलाचा विषय ठरली व त्यांच्या प्रत्येक वक्तव्यावर प्रचंड लाईक्स दिल्या.