लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करा

केंद्रीय पथकाचे निर्देश ः ठाणे जिल्ह्याचा घेतला आढावा
ठाणे, दि. 25 – करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याबरोबरच तातडीने सर्वेक्षण आणि वैद्यकीय तपासणी तसेच संस्थात्मक क्वारंटाईन करण्यावर भर देण्यात यावा. जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांनी केल्या.

केद्रीय स्तरावरील पथकाने वाढत्या करोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर आज ठाणे जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. या केंद्रीय पथकाने सकाळी कौशल्य हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रूग्णालय, होरायझन हॉस्पिटल या कोविड हॉस्पिटलला तसेच पारसिक नगर कळवा, अमृतनगर, मुंब्रा या ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. यानंतर केंद्रीय मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव मनोज जोशी यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे मनपाच्या बल्लाळ सभागृहात बैठक झाली.

जोशी म्हणाले, सर्व विभाग समन्वयाने काम करीत आहेत, ही समाधानाची बाब आहे. मात्र, जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी जास्तीत जास्त संशयितांची तपासणी करण्यात यावी. प्रत्येक क्षेत्रातील फिवर क्‍लिनिकच्या ठिकाणी योग्य ती दक्षता घेण्यात यावी. तसेच संस्थात्मक क्वारंटाईन वाढविण्याबरोबरच अधिक चाचण्या करण्यावर भर देण्यात यावा. विशेषत: झोपडपट्टीच्या अथवा जास्त घरांची गर्दी असलेल्या भागांवर विशेष लक्ष केंद्रित करावे.

सार्वजनिक स्वच्छतागृह आहे तेथे अधिक काळजी घेण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. तसेच कोविड आणि नॉन कोविड रुग्णालयांमध्ये रुग्ण तपासणी करण्यात यावी. कोविड व्यतिरिक्त इतर रुग्णांनादेखील उपचार मिळावेत यासाठी आवश्‍यक ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.