वॉशिंग्टन : हकालपट्टी करण्यात आलेल्या एका कमांडरला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याची शिफारस अमेरिकेच्या नौदलाने केली आहे. नौदलाची विमानवाहू नौका थिओडोर रुझवेल्टवरील सर्व कर्मचाऱ्यांनीही या कमांडरला पुन्हा कामावर घेण्याचा आग्रह धरला आहे. या विमानवाहू नौकेवर करोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याचे या कमांडरने नौदलाला पत्राद्वारे कळवले होते.
हे पत्र उघड झाल्यामुळे नौदलाने या कमांडरची हकालपट्टी केली होती. मात्र आपल्या नौकेवरील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या काळजीनेच या कमांडरने हे पत्र नौदलाला लिहीले होते, असे या कर्मचाऱ्यांच्यावतीने नौदलाला कळवले गेल्याचे समजते आहे.
कॅप्टन ब्रेट क्रोझियर असे या कमांडरचे नाव आहे. नौदलाने संरक्षण मंत्री मार्क ईस्पर यांना क्रोझियर यांना पुन्हा रुजू करून घेण्याची शिफारस केली आहे. थिओडोर रुझवेल्ट बोटीवर करोना विषाणूची लागण झाल्याचे वृत्त पसरल्यामुळे मोठी खळबळ माजली होती. त्या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश पॅम्टॅगॉनने दिले होते. त्यामध्ये कॅप्टन ब्रेट क्रोझियर हे निर्दोष असल्याचे निष्पन्न झाले होते.