राहुरी – मुळा धरणाच्या बॅकवॉटरमध्ये सवंगड्यांसह पोहोण्यास गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.आज सकाळी शनिवारी 11 वाजता ही दुर्घटना घडली. प्रशांत उत्तम खांडेकर (15, रा. जांभळी) असे या तरुणाचे नाव आहे. दुपारी साडेबारा वाजता त्याचा मृतदेह पाण्यातून काढण्यात यश आले. बाळुमामाची पालखी दोन दिवसांनी जांभळी परिसरात येणार होती.
त्यासाठी मेंढ्या धुण्यासाठी म्हणून प्रशांत त्याचे मित्र आप्पा बाचकर, अनिल खेमनर, अंकुश बाचकर यांच्यासह धरणावर गेले होते. मेंढ्या धुतल्यानंतर प्रशांतने पाण्यात बुडी मारली. तो पाण्यावर आला नाही. म्हणून त्याची शोधाशोध केली. सरपंच रामदास बाचकर, उपसरपंच पाटीलबा बाचकर, नामदेव खेमनर, दादा बाचकर, भागवत पवार, भाऊराव पवार आदींनी त्याचा शोध घेतला. दीड तासाच्या प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह पाण्यातून वर काढण्यात यश आले.खांडेकर ढवळपुरी येथे दहावी इयत्तेत शिकत होता.