नगर – जिल्ह्याच्या विकासात नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मोठे योगदान आहे. या बँकेला मोठी परंपरा लाभलेली आहे. बँकेचे कामकाज आजवर शिस्तीनेच चालले. पुढेही ही शिस्त कायम राहील. नवीन पिढीचे संचालक बँकेचा पुढील कारभार चांगल्या पद्धतीने करतील आणि बँकेला आणखी उंचीवर पोचवतील, अशी अपेक्षा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
नगर जिल्हा सहकारी बँकेच्या 63 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. बँकेची सभा आज ऑनलाइन पद्थतीने पार पडली. बँक नेहमीच राजकारण विरहित कामकाज करत असून बँकेने आता सेवकांना प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याची भूमिकाही थोरात यांनी व्यक्त केली.
राज्याचे ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनीही मार्गदर्शन केले. राज्यात मोठ्या प्रमाणात वीज बिलाची थकबाकी असून बँकेने शेतकर्यांसाठी वीज बिल भरण्यास कर्ज योजना राबवणे गरजेचे आहे. वीज बिल थकित रकमेतून आलेल्या वसुली रकमेतून जिल्ह्यातील विजेसाठीच्या पायाभूत सुविधासाठी या रकमेचा वापर होईल, असे तनपुरे म्हणाले.
बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांनी बँकेचे विविध योजनांची माहिती दिली. जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सेवा सोसायटयांचे संगणकीकरण करणार असून, जिल्ह्यातील सर्वच सोसायट्यांचे संगणीकरण एकच प्रणालीद्वारे होईल. त्यांचे डेटा सेंटर हे बँकेत असेल, असे ते म्हणाले. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकर्यांना बँकेच्या सर्व शाखांमधून शासनाचे डिजिटल सातबारे उतारे उपलब्ध करून देणार असल्याचेही अध्यक्ष शेळके म्हणाले.
ऑनलाइन पद्धतीने झालेल्या सभेत जवळपास दोन हजार सभासद सहभागी झाले होते. बँकेचे संचालक प्रशांत गायकवाड, शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष श्री सुधाकर कोंडाजी रोहम, राजहंस दूध संघाचे श्री गायकर यांनीे सभेत भाग घेतला तर जिल्हा सहकारी बँकेचे माजी संचालक श्री सबाजी गायकवाड व श्रीरामपूर मार्केट कमिटीचे माजी सभापती श्री सचिन गुजर यांनी सभेमध्ये प्रत्यक्ष मुद्दे मांडून भाग घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस वाचन केले. बँकेच्या संचालक आमदार मोनिका राजळे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी आमदार भानुदास मुरकुटे, करण ससाने, गणपतराव सांगळे, अमोल राळेभात, आशाताई तापकीर याचबरोबर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे बँकेचे माजी संचालक संपतराव म्हस्के, रावसाहेब शेळके, सबाजी गायकवाड राजेंद्र नागवडे, प्रतापराव शेळके, जयंत वाघ आदी उपस्थित होते.