नवी दिल्ली : जगात करोनाचा प्रसार वाढतच आहे. या विषाणूमुळे जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. त्यातच काही देश आर्थिक गणिते जुळवण्यासाठी नवनवीन संकल्पना अमलात आणताना दिसत आहेत. त्यात आता ब्रिटनमध्ये खवय्यांसाठी एक भन्नाट योजना सरकार घेऊन आली आहे. या योजनेद्वारे सरकार हॉटेलमध्ये जाऊन जेवण करणाऱ्या ग्राहकांचे अर्धे बिल भरणार आहे.
करोनामुळे ब्रिटनमध्ये इतके महिने लॉकडाउन होता. या काळात तिथला हॉटेल व्यवसाय पूर्णपणे कोलमडून पडला आहे. या उद्योगाला चालना देण्यासाठी यूकेचे चान्सलर ऋषि सनक यांनी ‘इट आऊट टू हेल्प आऊट’ ही अभिनव योजना आणली आहे. यूकेमधील ५३ हजारपेक्षा जास्त हॉटेल्स आणि कॅफेसना याचा फायदा होणार आहे. या योजनेतंर्गत नागरिकांचे हॉटेलमधील खानपानाचे ५० टक्के बिल सरकार भरणार आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे.
‘इट आऊट टू हेल्प आऊट’ या योजनेतंर्गत संपूर्ण ऑगस्ट महिन्यात सोमवार ते बुधवारपर्यंत खाद्यपदार्थ आणि मद्य या व्यतिरिक्त अन्य पेयांवर ५० टक्के सवलतीपासून प्रतिव्यक्ती १० पाऊंडापर्यंत सवलत मिळणार आहे. पार्सल धारकांना या योजनेचा लाभ मिळणार नाही. “आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये हॉटेल्स, कॅफे आणि बार खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. दहालाखापेक्षा जास्त लोक या उद्योगात काम करतात. त्यांना करोना व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे या संकटातून त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही आवश्यक ती सर्व पावले उचलू” असे ऋषि सनक यांनी सांगितले. जास्तीत जास्त ग्राहकांनी हॉटेसमध्ये यावे आणि या क्षेत्रातला रोजगार टिकून रहावा यासाठी यूके सरकारने ही अभिनव योजना आणली आहे. दरम्यान, या योजनेमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार असल्याचा विश्वासही सरकारकडून व्यक्त करण्यात आला आहे.