पिंपरी – मेट्रो प्रकल्पावर काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांचे पाच महिन्यांचे वेतन ठेकेदाराने थकविले आहे. यामुळे कामगार नेहरुनगर येथील कार्यालयासमोर कामगारदिनी (दि.1) उपोषण करणार आहेत. पिंपरी चिंचवड ते रेंजहिल्स येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरु असून हे काम महा मेट्रोने मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनीला दिले आहे. या कंपनीकडून विविध विभागात शंभर कामगार काम करत होते. या कामगारांचे डिसेंबर 2018 ते आजपर्यंत पाच महिन्यांचा पगार झालेला नाही.
या कामगारांचे मासिक पगार थकीत असून त्यातील काही कामगारांना एक महिन्याचा पगार दिला आहे. काही कामगारांना दोन महिन्याचा पगार देऊन सक्तीने राजीनामे लिहून घेतले आहेत. उर्वरीत कामगारांना राजीनामा न दिल्यास सक्तीने कामावरुन काढण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप केला आहे. दोन महिन्याचा पगार घेऊन राजीनामा दिल्यास उर्वरित दोन महिन्याचा पगार मिळण्याची कामगारांना शाश्वती नाही. त्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात कामगार प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, अरुण गायकवाड, अलिम तांबोळी, मोहन गायकवाड, आनंद कुमार, विनोद बिसेन हे सर्व कामगार उपोषण करणार आहेत.