पहिल्यांदाच घाटाखालच्या मतदानाने केली बरोबरी

गणित आकड्यांची ः बदलणार का राजकीय समीकरणे?

मतांचा खेळ, कुणाला बसणार फटका?

2009 आणि 2014 च्या निवडणुकीतही घाटाखाली उमेदवारांना मिळालेली मते घाटावर आल्यानंतर मात्र कमी होत असल्याचे चित्र पहायला मिळाले होते. मतविभागणीचा मोठा फटका प्रमुख उमेदवारांना बसला होता. 2009 च्या लोकसभा निवडणुकीत घाटाखालील पनवेल, कर्जत व उरण या तिन्ही विधानसभा मतदारसंघात 6 लाख 84 हजार 972 मतदारांपैकी 3 लाख 35 हजार 207 मतदारांनी मतदान केले होते. तर घाटावरील पिंपरी,चिंचवड व मावळ या मतदारसंघात 3 लाख 81 हजार 48 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.  2014 च्या निवडणुकीतही घाटाखाली 5 लाख 57 हजार 256 व घाटावर 6 लाख 17 हजार 208 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या दोन्ही निवडणुकीत विजयी उमेदवाराला घाटाखाली कमी मते मिळाली होती. मात्र, घाटावर मिळालेल्या मतांनी विजय मिळवला होता.

अमरसिंह भातलवंडे

पिंपरी – राज्यात विस्ताराने सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघाची ओळख आहे. भौगोलिक दृष्ट्या शहरी आणि ग्रामीण भागात विस्तारलेला असतानाच घाटाखालील व घाटावरील अशा दोन भागात हा मतदार संघ विभागला आहे. पुनर्रचनेत मावळ मतदारसंघ अस्तित्वात आल्यापासून झालेल्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत घाटाखालील विधानसभा मतदारसंघाच्या मतांची टक्केवारीही घाटावरील मतांच्या टक्केवारीपेक्षा कमी असायची. त्यामुळे, घाटावर मिळालेली मते उमेदवारांच्या विजयासाठी निर्णायक ठरायची आहेत. यावेळी झालेल्या चुरशीच्या लढाईत मात्र मतदारांमध्येही प्रचंड रस्सीखेच पहायला मिळाली. त्यामुळे, घाटावरील मतांच्या बरोबरीनेच घाटाखाली देखील मतदान झाले आहे. अशा स्थितीत घाटाखालील वाढलेले मतदान कोणाच्या फायद्याचे व कोणाला घातक ठरणार हे 23 मे रोजी निकालानंतरच स्पष्ट
होणार आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी अत्यंत चुरशीची आणि प्रतिष्ठेची लढाई झाली. शिवसेनेच्या विद्यमान खासदारांना राष्ट्रवादी आणि वंचित बहुजन आघाडीनेही जोराची टक्कर दिल्याने रंगतदार ठरलेल्या या लढतीमध्ये कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. मावळ मतदारसंघ विस्ताराने मोठा आहे. या मतदारसंघाची विभागणी घाटाखाली आणि घाटावर अशी दोन भागात करण्यात येते. घाटाखाली कर्जत, उरण व पनवेल हे तीन विधानसभा मतदारसंघ तर घाटावर पिंपरी, चिंचवड व मावळ या तीन विधानसभा मतदारसंघ येतात. मावळ घाटाखाली प्रामुख्याने शेतकरी कामगार पक्षाचे वर्चस्व आहे. मागील लोकसभा निवडणुकीतही शेकापने या भागात आपली ताकद सिध्द केली होती. तर घाटावर पूर्वी राष्ट्रवादी आणि सध्या शिवसेना व भाजपचे वर्चस्व आहे. मात्र, मागच्या दोन निवडणुकीचा विचार करता घाटाखाली कमी झालेल्या मतदानाचा फायदा शिवसेनेच्या उमेदवाराला झालेला दिसून येतो.

वाढलीली धाकधूक या निवडणुकीत मात्र घाटाखालील मतदारांनी पहिल्यांदाच घाटावरच्या मतांची बरोबरी केली आहे. या निवडणुकीत घाटाखाली 6 लाख 83 हजार 27 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तर घाटावरही 6 लाख 83 हजार 791 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे, घाटाखालील मतदानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे, प्रमुख उमेदवारांमध्ये धाकधूक निर्माण झाल्याचे दिसत आहे. तसेच घाटाखालच्या मतदारांनी केलेल्या बरोबरीमुळे ही लढत अजूनच रंगतदार ठरत आहे. आता घाटाखाली ही घाटावरील भागाच्या बरोबरीने मतदान झाल्याने दोन्ही भागातील मतदारांच्या भूमिकेवर मावळचा खासदार ठरणार असल्याचे चित्र सध्या तरी दिसत आहे. मात्र, घाटाखाली वाढलेली ही मते कोणत्या उमेदवाराला फायद्याची व कोणाला घातक ठरणार? याचे गूढ मात्र निकालानंतरच उलघडणार आहे.

शेकापच्या साथीने राष्ट्रवादीने लढवलेली रणनिती सेना-भाजप रोखणार?

राज्यातील महत्वाचा मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रतिष्ठेची केली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा असणाऱ्या पवार कुटुंबातील तिसरी पिढी मावळ लोकसभा मतदार संघातून राजकारणाच्या आखाड्यात प्रवेश करत आहे. या मतदार संघाच्या निर्मितीपासून कधीही येथे राष्ट्रवादी कॉंग्रेसला विजय मिळालेला नसतानाही पवार कुटुंबाने पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून निवडणुकीत उतरवले. यावेळी राष्ट्रवादीने घाटाखाली वर्चस्व असलेल्या शेतकरी कमगार पक्षाला आपल्या सोबत घेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनाच मैदानात उतरवून शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी कॉंग्रेस शिवसेनेच्या विजयाची हॅट्रिक रोखू शकेल काय ? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. घाटाखालच्या आणि घाटावरच्या मतदारांनी आपला खासदार म्हणून कोणाची निवड केली आहे? हे येत्या 23 मे लाच कळू शकेल.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.