प्रत्यक्ष मतदान वाढले, पण टक्केवारी घटली

-2014 च्या तुलनेत दोन लाख अधिक मते, परंतु 0.62 टक्‍क्‍यांनी कमी मतदान
-वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला? निकालाबाबत उत्सुकता शिगेला

पिंपरी – मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी ही 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत काही प्रमाणात घटली. शहरी मतदारांनी फारसा प्रतिसाद दिलेला नसल्याने मतदानाच्या टक्केवारीत घट झाली असली, तरी प्रत्यक्ष मतांच्या संख्येमध्ये मात्र तब्बल दोन लाख मतांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेल्या मतदानाचा फायदा कोणाला आणि फटका कोणाला याविषयी आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. 2014 साली एकूण 11 लाख 74 हजार मतदारांनी मताधिकाराचा उपयोग केला होता, तर 2019 साली 13 लाख 66 हजार मतदारांनी मतदानाचा हक्‍क बजावला.

मावळ लोकसभा मतदारसंघात मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी यावेळी निवडणूक विभागाने मोठे प्रयत्न केले होते. विस्ताराने मोठ्या असलेल्या या मतदारसंघात शहरी आणि ग्रामीण मतदारांचा मोठा समावेश आहे. त्यामुळे, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक विभागाने प्रचंड मेहनत केली होती. मात्र, त्यानंतरही मतदानाच्या टक्‍केवारीत अपेक्षित वाढ झालेली पहायला मिळाली नाही. मावळ लोकसभेसाठी 59.49 टक्के मतदानाची नोंद झाली. म्हणजेच 2014 च्या तुलनेत 0.62 टक्के कमी मतदान झाले. असे असले तरी, 2014 च्या निवडणुकीच्या तुलनेत प्रत्यक्ष मतदानाचा आकडा मात्र वाढला आहे.

मावळ लोकसभेसाठी 2009 च्या निवडणुकीत केवळ 44.71 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यावेळी 7 लाख 17 हजार 616 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तर 2014 च्या निवडणुकीत वाढ होऊन 60.11 टक्के मतदान झाले होते. त्या निवडणुकीत 11 लाख 74 हजार 335 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. आता 2019 च्या निवडणुकीत सरासरी मतदानामध्ये घट झाली असली तरी 22 लाख 97 हजार 405 मतदारापैकी एकूण 13 लाख 66 हजार 818 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे मागच्या निवडणुकीच्या तुलनेत 1 लाख 92 हजार 483 अधिक मतदान झाले आहे. विशेष म्हणजे यावेळी मतदानाची वेळ तासभराने वाढवण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही मावळ मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी किंचित घटली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.