सातारा – पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीतून भाजपमध्ये “इनकमिंग’ सुरू असतानाच या मेगा भरतीचा दुसरा अंक सोलापूरमध्ये रंगणार आहे. साताऱ्यातून भाजपच्या गळाला कोणते नेते लागणार, याची ठोस माहिती अजून समोर आलेली नाही. कोल्हापूरच्या धनंजय महाडिकांचा भाजप प्रवेश ठरल्याचे सांगितले जात असताना राष्ट्रवादीचे अनेक बिनीचे मोहरे त्यांच्या राजकारणाचा थांगपत्ता लागू देईनासे झाले आहेत.
साताऱ्यात खा. उदयनराजे भोसले आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत पुणे व मुंबई येथे राजकीय खलबते सुरू आहेत. मात्र, याबाबत अजून सस्पेन्स आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा 1 सप्टेंबरला सोलापूरमध्ये होणार आहे. त्याचा मुहूर्त ही मंडळी साधणार का, हा प्रश्न असला तरी, भाजपच्या दुसऱ्या मेगा भरतीची चर्चा सुरू आहे.
प्रवेश सोलापुरात की मुंबईत
सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची धुरा आतापर्यंत जबाबदारीने सांभाळणारे शरद पवारांचे “चाणक्य’ आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भाजप प्रवेशावरून पुण्यात राजकीय खल सुरू आहे. यासाठी आतापर्यंत तीन बैठका झाल्या आहेत. रामराजे व धनंजय महाडिक यांचा भाजप प्रवेश एकाच वेळी व्हावा, असे प्रयत्न आहेत. मात्र, रामराजेंचे जावईप्रेम आणि वाई, फलटण आणि कुलाबा या विधानसभा मतदारसंघांची मागणी, यामुळे भाजपची मंडळी सावध झाली असली तरी त्यांचा प्रवेश होणारच, अशी माहिती फलटणमधून येऊ लागल्याने जिल्ह्यात दुसरा मोठा भूकंप होण्याची चिन्हे आहेत. मात्र, प्रवेश सोलापूरमध्ये करायचा की मुंबईत याचा निर्णय होत नसल्याने रामराजेंचे गाडे अडले आहे, असे बोलले जात आहे.
प्रभाकर घार्गेंच्या प्रवेशाचीही चर्चा
विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्याही भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. खटाव येथे नुकत्याच झालेल्या मेळाव्यात घार्गे यांनी जनतेतून आमदार म्हणून निवडून येण्याची इच्छा व्यक्त करताना खटाव तालुक्याच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केला होता. माण-खटाव मतदारसंघात गोरे बंधूंना विरोध करणाऱ्यांमध्ये प्रभाकर घार्गे यांचे नाव अग्रेसर आहे. त्यामुळे भाजप प्रवेशावरून त्यांचेही तळ्यात-मळ्यात सुरू आहे.